

आकुर्डी: आकुर्डी, विवेकनगर, आकुर्डी पोस्ट ऑफिस, भाजी मंडई, तुळजाईवस्ती या परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बर्याच कालावधीपासून या परिसरामध्ये घोळक्याने कुत्र्यांचा वावर असतो. या कुत्र्यांच्या भीतीमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
पिंपरी चिंचवड परिसरामध्ये सध्या विकास कामे जोरात सुरू आहेत. अरुंद रस्त्यांमुळे नागरिक मिळेल त्या रस्त्याने भाजी मंडई, पोस्ट ऑफिस, तुळजाई माता मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग शोधत असतात. विवेकनगर, आकुर्डी भाजी मंडई हा मध्यवर्ती परिसर व दाट लोकवस्तीचा आहे. या परिसरामध्ये दवाखाने, हॉटेल, हॉस्पिटल, विविध दुकाने, पोस्ट ऑफिस, समाजसेवा केंद्र, वृद्धाश्रम, शाळा आहेत. (Latest Pimpri News)
परिसरामध्ये सातत्याने महिला व लहान मुलांचा वावर असतो. मात्र, सातत्याने रस्त्याच्या बाजूला, पार्किंग केलेल्या वाहनांच्या खाली, अडगळीच्या ठिकाणी मोकाट कुत्रे बसलेली असतात. अचानकपणे एकाच वेळेस हे कुत्रे अंगावरती धावून येतात, त्यामुळे वाटसरूची व प्रवाशांची तारांबळ उडते.
अशा परिस्थितीमध्ये अचानकपणे रस्त्यावर अपघातजन्य परिस्थिती निर्माण होते. अशा प्रकारचे प्रसंग अनेक वेळा उद्भवलेले आहेत. या कुत्र्यांचा वेळेस बंदोबस्त केला नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी, दुकानदार करत आहेत.