

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन माध्यमातून मालमत्ताकर भरण्यास मोठी पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 16 जुलै 2025 या कालावधीत तब्बल 4 लाख 28 हजार मालमत्ताधारकांनी एकूण 544 कोटी रुपयांची बिलांचा भरणा केला आहेत. तर, त्यापैकी घर बसल्या स्मार्ट मोबाईलद्वारे तब्बल 443 कोटी 38 लाख रूपये जमा करण्यात आले आहेत.
ऑनलाईन बिल भरणार्यांना 4 टक्के सवलत
एक एप्रिल ते 30 जून 2025 या कालावधीत ऑनलाईन बिल भरणार्यांना 10 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्या सवलतीचा लाभ 3 लाख 23 हजार 239 मालमत्ताधारकांनी घेतला आहे. एक जुलै ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑनलाईन बिल भरणार्यांना 4 टक्के सवलत आहे. नागरिक विविध पर्यायांचा वापर करून बिल भरणा करत आहेत. ऑनलाईन प्रणाली, कॅश काऊंटर, ईडीसी, आरटीजीएस, डिमांड ड्राफ्ट, बीबीपीएस अशा माध्यमातून नागरिक बिल भरत आहेत. (Latest Pimpri News)
ऑनलाईन सेवेमुळे घरबसल्या बिल भरता येते
तीन लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी ऑनलाईन मालमत्ताकर भरला आहे. महापालिकेच्या ऑनलाईन सेवेमुळे नागरिकांना घरबसल्या बिल भरण्याची सुविधा मिळते. यापुढेही आम्ही अशा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत राहू, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.
चेक बाउन्स झाल्याने कारवाईस सुरुवात
शहरातील अनेक मालमत्ताधारकांनी चेकद्वारे मालमत्ताकर भरणा केला होता. काही चेक वटले नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकरणांमध्ये महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. संबंधित मालमत्ताधारकांची मालमत्ता सील करणे, नळजोड तोडणे आदी कारवाई केली जात आहे. कारवाई टाळण्यासाठी बिलाचा तात्काळ भरणा करावा, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे.
असा झाला भरणा
ऑनलाईन : 394 कोटी 33 लाख
रोख : 32 कोटी 70 लाख 80 हजार
चेक : 25 कोटी 61 लाख 23 हजार
ईडीसी : 6 लाख 6 हजार
आरटीजीएस : 24 कोटी 62 लाख 85 हजार
डीडी : 74 लाख 32 हजार
बीबीपीएस : 17 लाख 83 हजार