

जयसिंगपूर; संदीप शिरगुप्पे (पुढारी ऑनलाईन) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २० वी ऊस परिषद आज (दि. १९) जयसिंगपूर येथे पार पडली. या ऊस परिषदेत केंद्र आणि राज्य सरकारवर स्वाभमनीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. यावेळी स्वाभिमानीचे माजी प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर ( Ravikant Tupkar ) यांनी जोरदार भाषण करत विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यावर जोरदार टीका केली. खासदार धैर्यशील माने नुसतं जॅकेट आणि कपडे घालून चालणार नाही. महापुरात शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहे त्याकडे जरा लक्ष द्यावे, असा टोला तुपकर यांनी लगावला.
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील नागरिकांनी एक नोट, एक प्लेट भडंग, एक वाटी रस्सा आणि पाच वर्षे बोंबलत बस्सा अशीच स्वत:ची अवस्था करून घेतलीय. धैर्यशील मानेंनी अभिनेत्यासारखी चांगली चांगली कपडे घातली म्हणजे चांगले खासदार होतील असे नाही. माने साहेब तुम्हाला निवडून येऊन ३ वर्षे झाली, पण एकदाही कुठं गोरगरीब जनतेसाठी राबताना दिसला नाही, असे टीकास्त्र तुपकर ( Ravikant Tupkar ) यांनी सोडले.
ते पुढे म्हणाले, तुम्ही एकदा योगायोगाने निवडून आला आहे. इथल्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे. त्यांची कामे करा आमच्या भागात अजूनही हातकणंगले मतदार संघाचे खासदर राजू शेट्टीच असल्याचा तुपकर यांनी टोला लगावला.
या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडला पाने पुसली आहेत. शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्हाला कळणार नाहीत. राज्यातील राजकारण्यांनी आपल्या बायकांना गाई म्हशी आणि रानात कामाला लावून द्यावे मग समजेल शेतकऱ्याच जगणं काय असते. मागच्या सरकारने निदान पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ९०० रुपये प्रमाणे मदत केली. पण या सरकारने १५० रुपये देऊन शेतकऱ्यांची चेष्टा लावल्याची टीका तुपकर यांनी केली.
आमच्या विदर्भात मागचा महिनाभर झालेल्या पावसाने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. यावर हे ठाकरे सरकार बोलायल तयार नाही. मग यांच्या सोबत राहून काय उपयोग. राजू शेट्टींनी आमदारकीवर लाथ मारून सवथा सुभा मांडावा असेही तुपकर म्हणाले.