Pele Football God : फुटबॉलचा देव (१९४० – २०२२)

Pele Football God : फुटबॉलचा देव (१९४० – २०२२)
Published on
Updated on

एखादी उत्तम पाककृती पुस्तके वाचून चमच्यांची मापे मोजूनही चांगली बनवता येतो आणि एखादा सराईत हात अंदाजाने चिमूट आणि मुठीची मापे वापरतही तो नैसर्गिकपणे सुंदर बनवतो. खेळाचे हे असेच असते. क्रिकेट असो, फुटबॉल असो अथवा हॉकी असो.. कोचिंग मॅन्युअलप्रमाणे शिकून काही खेळाडू महान होतात तर काही निव्वळ नैसर्गिक गुणवत्तेने महान होतात. जशी हे नैसर्गिकपणे सुंदर पदार्थ बनवणारी अन्नपूर्णा वाटते तसेच हे नैसर्गिक गुणवत्तेचे खेळाडू मैदानावरचे जादूगार असतात. (Pele Football God)

एडसन अरांतेस दो नासिमेंटो… हे नाव अशाच एका फुटबॉलच्या मैदानावरील जादूगाराचे आहे. नाव वाचून कदाचित तुम्हाला संभ्रम पडला असेल हा कोण? पण या नावाच्या महान फुटबॉलपटूला जग पेले म्हणून ओळखते. एकेकाळी वेस्ट इंडिजचे क्रिकेट जसे नैसर्गिक होते तसेच ब्राझीलचा फुटबॉल अजूनही नैसर्गिक आहे. अगदी यंदाच्या फिफा विश्वचषकातही ब्राझीलचे वेगळेपण इतर संघांपेक्षा उठून दिसले. पेले या खेळाचा मैदानावरील, मैदानाबाहेरील देव होता. ब्राझीलच्या प्रसिद्ध सांबा नृत्याची झलक अगदी आजही नेमार, अल्व्हेस, कुटिन्हो यांच्या पदलालित्यात बघायला मिळते. पेले या फुटबॉलच्या मैदानावरील सांबा नृत्याचा जनक आहे. त्याचा खेळ बघणे म्हणजे फुटबॉलचा सामना न वाटता ब्राझीलचा कार्निव्हल बघितल्यासारखे वाटायचे. जेव्हा एखाद्या खेळाडूच्या प्रसिद्धीला त्याच्या देशाच्या सीमा ओलांडून अगदी प्रतिस्पर्धी देशातूनही मान्यता मिळते तेव्हा तो खेळाडू देवत्व पावतो. पेलेची प्रसिद्धी ब्राझीलच्या सीमा ओलांडून केव्हाच जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचली. (Pele Football God)

अर्थात, निव्वळ या नैसर्गिक गुणवत्तेमुळे खेळाडू मोठा ठरू शकतो, पण तो महान होत नाही. एखादा खेळाडू महान व्हायला तीन मुख्य गोष्टींची गरज असते. पहिले म्हणजे तो खेळाडू किती काळ उच्च दर्जाच्या स्पर्धात खेळला, दुसरे म्हणजे त्याने त्याच्या संघासाठी किती स्पर्धा जिंकल्या आणि तिसरे म्हणजे त्याची आकडेवारी. फुटबॉलच्या मैदानावर मॅराडोना ते रोनाल्डोपर्यंत अनेक थोर खेळाडू झाले, पण या सर्वात पेले सर्वच निकषात या सर्वांच्या वर आहे. पेलेने 1956 ते 1977 अशा तब्बल 21 वर्षांच्या कारकिर्दीत 1363 सामन्यांत (ब्राझील, क्लब, मैत्रीच्या लढती) तब्बल 1279 गोल करायचा गिनिज बुक रेकॉर्ड केला आहे. मॅराडोनाचे 590 क्लब सामन्यातून आणि 87 अर्जेंटिना संघाकडून खेळताना 344 गोल आहेत. निव्वळ देश आणि क्लबचा विचार केला तर पेलेचे 762 गोल्सचा रेकॉर्ड 50 वर्षे अबाधित होता. आता रोनाल्डो (813) आणि मेस्सी (764) मध्ये चुरस आहे. पेलेने या काळात 3 वेळा ब्राझीलला विश्वचषक जिंकून दिला. ज्या वयात ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही किंवा मतदानाचा अधिकार नसतो त्या कोवळ्या 17 व्या वर्षी त्याने देशाला विश्वचषक जिंकून दिला. फुटबॉलमध्ये गोल करण्याबरोबरच असिस्ट म्हणजे सहकार्‍यांना गोल करायला मदत करायलाही महत्त्व असते. (Pele Football God)

ओएलच्या नावावर विश्वचषकात सर्वात जास्त असिस्ट करायचा रेकॉर्ड आहे. पेलेचे महानपण सिद्ध करायला इतक्या गोष्टी पुरेशा आहेत. क्रिकेटमध्ये जे स्थान ब्रॅडमनचे आहे तेच फुटबॉलमध्ये पेलेचे आहे. कुणी म्हणेल ब्रॅडमनच्या काळात क्रिकेट आणि पेलेच्या काळात फुटबॉल वेगळे होते, नियम वेगळे होते, आजच्या इतकी स्पर्धा नव्हती, पण कुठच्याही महान खेळाडूचे मोठेपण हे त्या त्या काळातील आव्हानांवर ठरते तेव्हा ब्रॅडमनही महान होता आणि पेलेही महान आहे.

पेलेला देव का म्हणायचे याची अनेक उदाहरणे देता येतील, पण आपल्या भारतीयांसाठी या देवाचे जेव्हा दर्शन पहिल्यांदा झाले तेव्हा इतका जनसागर पेलेने कधी बघितला नव्हता. पेलेच्या कारकिर्दीचे ते शेवटचे काही सामने होते. न्यूयॉर्क कॉसमॉस संघाचा एक महोत्सवी सामना 1977 साली कोलकात्याच्या मोहन बगान क्लबबरोबर आयोजित केला होता. पेलेच्या संघात जिओर्जिओ चिनाग्लिया होता त्याने विमान कोलकात्याला उतरताना खिडकीतून खाली पहिले आणि पेलेला गमतीत म्हणाला आपण इथे खेळायला नको कारण इथे मैदान नाही तर फक्त माणसेच दिसत आहेत. ते खरेच होते कारण तेव्हाच्या कोलकात्याच्या डमडम विमानतळाबाहेर पेलेचे दर्शन व्हावे म्हणून लाखभर चाहत्यांचा समुदाय उभा होता. जी गोष्ट विमातळाची तीच हॉटेलच्या बाहेरची. सामन्याच्या आदल्या रात्री खूप पाऊस पडल्याने चाहत्यांना या देवाचे मैदानात दर्शन होते का नाही याची धाकधूक होती, पण ईडन गार्डन्सच्या लाखभर प्रेक्षकांसमोर पेले त्या चिखलात खेळायला उतरला आणि पुढची 30 मिनिटे लोकांची अवस्था अजि म्या ब्रम्ह पाहिले अशी होती. मोहन बगानने उत्तम खेळ करत 2-0 आघाडी घेतली होती, पण नंतर पाहुण्यांनी सामना 2-2 बरोबरीत सोडवला. मोहन बागानच्या मोहम्मद हबीबचे पेलेने आवर्जून कौतुक केले. मोहम्मद हबीबच्याआयुष्यातील हा सर्वात मोठा पुरस्कार असावा. पेले हा नुसत्या ब्राझीलचाच नाही तर फुटबॉलचा चेहरा होता आणि या चेहर्‍याच्या दर्शनाने लाखो चाहत्यांना अनेक वर्षे सुखावले.

  • निमिष वा. पाटगावकर


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news