

पुढारी ऑनलाईन: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. मणिपूर व्हायरल व्हिडीओ आणि हिंसाचारावरून आज पुन्हा संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. सभागृह सुरू होताच, मणिपूरच्या परिस्थितीवरून सभागृहात विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. विरोधकांच्या प्रचंड गदारोळामुळे गेल्या सहा दिवसांपासून दोन्ही सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाले आहे. आज अधिवेशनाच्या सातव्या दिवशी देखील हीच स्थिती आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षांच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. मणिपूर प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात उत्तर द्यावे, या मागणीवर विरोधक ठाम आहेत. विरोधकांच्या प्रचंड गदारोळानंतर लोकसभा सभागृहाचे कामकाज आज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. तर राज्यसभेचे कामकाज आज (दि.२८ जुलै) दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. याआधीही गेल्या सहा दिवसांपासून लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सक्षागृहांचे कामकाज मणिपूर व्हायरल व्हिडिओवरून विरोधकांच्या गदारोळामुळे विस्कळीत झाले आहे.