

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावरुन चर्चा घेण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी संसदेच्या उभय सदनात आज (दि.२७) प्रचंड राडेबाजी केली. काॅंग्रेस, तृणमूल, द्रमुकसहित इतर विरोधी सदस्यांनी केलेल्या फलक आणि घोषणाबाजीमुळे बहुतांश कामकाज वाया गेले. दरम्यान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव पुढील आठवड्यात चर्चा आणि मतदानासाठी घेतला जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Parliament Monsoon Session)
लोकसभेत सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर तमाम विरोधी सदस्यांनी 'वेल'मध्ये येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे संसद चालत नाही, असे सांगत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले. दुपारच्या सत्रात गोंधळातच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यावर निवेदन केले. गदारोळावर संतप्त झालेल्या केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काॅंग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांना बोलू दिले जाणार नाही, असे सांगितले. यावर गोंधळ जास्तच वाढला.