

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग तब्बल २३४ दिवसांनंतर मुंबई पोलिसांसमोर हजर झाले आहेत. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा क्रमांक ११ सिंग यांची गेल्या पाच तासांहून अधिक वेळ चौकशी करत आहे. त्यामुळे सिंग यांच्यामागील चौकशीचा ससेमिरा सुरू झाल्याचे समजले जात आहे.
सचिन वाझे प्रकरणानंतर परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले. त्यामुळे देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. तसेच त्यांना ईडीने अटकही केली. देशमुख सध्या कोठडीत असून परमबीर सिंग हे फरार होते.
त्यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून बिमल अग्रवाल या बिल्डरने दाखल केलेल्या तक्रारीबाबत त्यांची चौकशी सुरू आहे. यातील काही गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. या गुन्ह्यांमध्ये अपहरण, खंडणी, भ्रष्टाचार आणि ॲट्रॉसिटीचा समावेश आहे. याबाबत मुंबई आणि ठाण्यातील न्यायालयांनी सिंग यांना फरार घोषित केले होते. तसेच त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यानच्या काळात सिंग यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्याने त्यांना अटकेपासून संरक्षण मिळाले. त्यानंतर लगेचच परमबीर सिंग यांनी आपण चंदीगढ येथे असल्याचे सांगितले. सिंग यांनी त्यानंतर मुंबईतील येत गुन्हे शाखेसमोर हजेरी लावली. सिंग यांच्याविरोधात मरीन ड्राइव्ह पोलिसांत १५ कोटींच्या खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी दोघेजण अटकेत आहेत. कोपरी पोलिसांत सिंग यांच्यासह एक उपायुक्त आणि अन्य तिघांविरोधात खंडणी, फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील नगर पोलिस स्टेशन केतन तन्नाने दिलेल्या तक्रारीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याबरोबरच हॉटेल सुरू ठेवण्यासाठी खंडणीची मागणी केली आहे. पोलिस अधिकारी अनुप डांगे यांनी सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणांची चौकशी सुरू असून एसआयटी, गुन्हे शाखा आणि एससीबी स्वंतत्र चौकशी करत आहे.
हेही वाचा :