

नगर, पुढारी वृत्तसेवा: गेल्या आठवड्यापासून वेध लागलेल्या पंचायत राज समितीच्या दौर्यात काहीसा बदल झाला आहे. त्यानुसार आता 23 जून ऐवजी ही समिती 28 पासून नगर दौर्यावर येणार आहे. शासनाकडून जिल्हा परिषदेला तसे पत्र प्राप्त झाले आहे.
राज्यातील 32 आमदारांची पंचायत राज समिती 23 ते 25 जून या कालावधीत नगर दौर्यावर येणार असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून जोरदार तयारीही सुरू आहे. त्यासाठी सीईओ आशिष येरेकर हे सर्व विभागप्रमुखांसमवेत मॅरेथॉन बैठका घेत आहेत. तालुका स्तरावरील अधिकार्यांनाही दप्तर पूर्ततेबाबत सूचना केल्या जात आहे.
अशाप्रकारे प्रशासनाची धावपळ सुरू असताना गुरुवारी रात्री उशिराने पंचायत राजच्या नियोजित कार्यक्रमात बदल झाल्याचे कळविण्यात आले आहे. त्यानुसार आता 28 ते 30 जून या तीन दिवसांत पंचायत राज नगर दौर्यावर येणार आहे. त्यामुळे 27 ते 1 जून या कालावधीत समितीच्या आमदारांची निवास व्यवस्था करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, दौर्यापूर्वी 25 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत राज समितीतील सदस्य हे स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेवून जिल्ह्यातील विकास कामांवर अनौपचारिक चर्चा करणार आहेत.