Pakistan floods | पूरग्रस्त पाकिस्तान मोठ्या संकटात, भारतातून करणार अन्नधान्य आयात

Pakistan floods | पूरग्रस्त पाकिस्तान मोठ्या संकटात, भारतातून करणार अन्नधान्य आयात
Published on
Updated on

[visual_portfolio id="305906"]
इस्लामाबाद; पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानमध्ये महापुराने (Pakistan floods) एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. येथील लाखो लोक प्रभावित झाले असून अन्नधान्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यासाठी पाकिस्तान आता भारतातून अन्नधान्य आयात करण्याचा विचार करत आहे. तसे स्पष्ट संकेत पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल (finance minister Miftah Ismail) यांनी दिले आहेत. काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताशी तणावपूर्ण संबंधांची पार्श्वभूमी असतानाही पाकिस्तानला आता अडचणीच्या काळात भारताची आठवण झाली आहे. "विनाशकारी पुरामुळे निर्माण झालेल्या टंचाईमुळे भारतातून अन्नधान्य आयात करण्याबाबत पाकिस्तान सरकार मुख्य स्टेकहोल्डर्स आणि प्रमुख भागधारकांशी सल्लामसलत करेल", असे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी म्हटले आहे. भारतातून अन्नधान्य आयातीच्या मुद्यावरुन विरोधकांकडून टीका होत असतानाही पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानमधील पुरामुळे (Pakistan floods) मृतांचा आकडा १,१०० वर पोहोचला आहे. लाखो लोक विस्थापित झाले आहेत. तर अचानक आलेल्या पुरामुळे हजारो एकरवरील पिके नष्ट झाली आहेत. या पार्श्वभूमीवर भारतातून अन्नधान्य आयात करण्याची कल्पना इस्माईल यांनी बोलून दाखवली आहे.

"एकाहून अधिक आंतरराष्ट्रीय एजन्सींनी भारतातून सीमेमार्गे रस्त्यावरुन अन्नधान्य आयातीच्या परवानगीसाठी सरकारशी संपर्क साधला आहे. यासाठी सरकार स्टेकहोल्डर्स आणि भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर अन्नधान्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर आयातीला परवानगी देण्याचा निर्णय घेईल.", असे इस्माईल यांनी ट्विट करत म्हटले आहे.

दरम्यान, अचानक आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या अन्न टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने इराण आणि अफगाणिस्तानमधून कांदा आणि टोमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरामुळे देशाचा एक तृतीयांश भाग पाण्याखाली गेला आहे. शेतजमिनी उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामुळे काही जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीसह भाजीपाला आणि फळांचा तुटवडा निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि संशोधन मंत्रालयाने फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूला पुढील तीन महिन्यांसाठी कांदा आणि टोमॅटो आयातीवरील कर आणि शुल्क माफ करण्यास सांगितले आहे. या मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार बाजारातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करणे आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हे उपाय केले जात आहेत.

या आधीही इस्माईल यांनी सूचित केले होते की सरकार अन्नधान्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारतातून आयात करण्यास परवानगी देऊ शकते. भारताने काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला. त्यानंतर पाकिस्तानने भारतातून होणारी अन्नधान्य आयात कमी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news