

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदची लाहोर हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. दहशतवाद्याना पैसे पुरवत असल्याचा आरोप त्याच्यावर होता. सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते; परंतु लाहोर हायकोर्टाने त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी हाफिज सईदसह (hafiz saeed) अन्य ६ जणांना निर्दोष ठरविण्यात आले आहे. सर्व आराेपी जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते. सर्वांवर दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याचे आरोप हाेता.
नेतृत्वात जमात-उद-दावा आणि लश्कर-ए-तोएबा या दोनही दहशतवादी संघटना हाफिज सईद चालवत असल्याचा आरोप आहे. लश्कर-ए-तोएबाने २००८ साली मुंबई येथे झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह १६६ लोकांची हत्या झाली होती.
पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाने (CTD) एफआयआर नोंदवल्यानंतर या वर्षी एप्रिलमध्ये लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाच्या आदेशानुसार जमात-उद-दावाच्या म्हाेरक्या हाफीज सईद याच्यासह अन्य आराेपींना पाेलिसांनी अटक केली होती. यामध्ये मलिक जफर इक्बाल, याह्या मुजाहिद (JUD प्रवक्ता), नसरुल्लाह, समिउल्लाह आणि उमर बहादूर यांना प्रत्येकी नऊ वर्षांची आणि हाफीज अब्दुल रहमान मक्की (सईदचा मेहुणा) याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली हाेती. तसेच आराेपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही सत्र न्यायालयाने दिले होते.
न्यायालयाच्या एका अधिकाऱ्यानी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुख्य न्यायमूर्ती मुहम्मद अमीर भाटी आणि न्यायमूर्ती तारिक सलीम शेख यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. दरम्यान फिर्यादी पक्षाकडे सबळ पुरावे नसल्याने आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचेही ते म्हणाले.
खंडपीठाने जमात-उद-दावाच्या नेत्यांची याचिका स्वीकारली; पण कोणताही पुरावा नसल्यामुळे फिर्यादी साक्षीदाराचे म्हणणे विश्वासार्ह धरता येणार नसल्याचे लाहोर उच्च न्यायालयाने सांगितले.