मनगटात वेदना? जाणून घ्‍या काय आहेत कारणे आणि उपाय

मनगटात वेदना? जाणून घ्‍या काय आहेत कारणे आणि उपाय
Published on
Updated on

खूपदा आपण काम करता करता आपल्या हाताचे मनगट दुखू लागते. काही तरी लचकले असेल म्हणून आपण दुर्लक्ष करतो; पण नंतर या वेदना इतक्या वाढतात की सहन होत नाहीत; मग त्यावर काही मलम लाव, पेनकिलर घे, शेक दे असले प्रयोग सुरू होतात. साधे मनगट तर दुखतेय होईल बरे, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले तर पुढे शस्त्रक्रिया करण्याचीही वेळ येऊ शकते हे लक्षात घ्या. (Carpal Tunnel Syndrome )  जाणून घेवूया  मनगट का दुखते? यामागील कारणे

तुम्ही जर तासनतास कॉम्प्युटरवर काम करत राहिल्याने किंवा खूप मोठ्या वजनाची वस्तू उचलल्यामुळे अचानक मनगटात वेदना होऊ लागतात. अनेकदा आपण या दुखण्याकडे दुर्लक्ष करतो; पण पुढे हे दुखणे चिंतेचा विषय होऊन जाते. या वेदना इतक्या वाढतात की शस्त्रक्रियेची वेळ येते. अर्थात अगदी थोड्या प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया केली जाते. मनगटात दुखण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असते. थंडीच्या दिवसांत या वेदना आणखी वाढतात. (carpal tunnel syndrome)

कार्पल टनल सिंड्रोम | Carpal Tunnel Syndrome

सतत कॉम्प्युटरवर माऊस आणि की बोर्डचा वापर केल्याने हाताची बोटे आणि मनगटावर जोर पडू लागतो. अनेकदा सूजही येते, त्यामुळे मनगट सुन्न होते किंवा मुंग्या आल्याप्रमाणे झिणझिण्या येतात. अनेकदा याचा परिणाम हात आणि बोटांवरही होतो. याला 'कार्पल टनल सिंड्रोम' असे म्हणतात. कार्पल टनल म्हणजे मनगटाजवळ असलेली एक अरुंद, बोगद्याप्रमाणे असलेली नलिका मार्ग आहे. याला जोडलेल्या नसा आणि तंतू अंगठा, मधले बोट आणि करंगळीला जोडलेले असतात. अशा वेळी जेव्हा केव्हा मनगटाच्या आसपास पेशी आणि नसांवर दाब येतो तेव्हा त्याचा परिणाम बोटे आणि हाताच्या तळव्यावर होऊ लागतो.

जुनी जखम

एखादी जुनी जखम मनगटातील वेदनेचे कारण असू शकते. जेव्हा जखम होते तेव्हा ती बरी झाल्यावर आपण विसरून जातो, पण कधीतरी नंतर ती अचानक आपल्याला आठवण करून देते, म्हणजे मनगट दुखू लागते. म्हणूनच मनगटाला काही जखम झाली असेल तर त्याचे पूर्ण परीक्षण करणे आवश्यक आहे. डॉक्टरांशी संपर्क साधून मनगटाच्या हाडाला काही दुखापत तर झालेली नाहीये ना याची खात्री करून घेतली पाहिजे. विशेषत: खेळाडूंना याची जास्त गरज असते. अशाप्रकारे मनगट दुखण्याची समस्या महिलांना गरोदर असताना, मेनोपॉज आणि लठ्ठपणा वाढल्यावर निर्माण होते.

उपाय

रोज सकाळी आणि संध्याकाळी वेदनाशामक तेलाने मनगटाची मालिश करा. काही वेळ मनगटाला आराम द्या. डॉक्टर प्लिलंट घालण्याचाही सल्ला देतात तो पाळा. मनगट दुखत असेल तर त्याची जास्त हालचाल करू नका. वजनदार वस्तू उचलू नका. कॉम्प्युटरवर जर सतत हातांच्या जोरावर काम करत असाल तर मध्ये मध्ये हातांना जरा आराम द्या. स्माईली बॉलने काही काळ व्यायाम करा. जेव्हा मनगटांत दुखू लागते तेव्हा ते बर्फाने शेका. त्यामुळे वेदनेपासून आराम मिळतो. वेदनाशामक औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. मनगटात जास्तच दुखत असेल किंवा वारंवार दुखत असेल तर डॉक्टरांना दाखवाच, पण त्याचबरोबर तुमच्या काम करण्याच्या पद्धतीतही बदल करा. फिजिओथेरपी आणि औषधाने लवकर आराम मिळतो.

मनगटाची योग्य स्थिती

काम करताना मनगट योग्य स्थितीत असणेही आवश्यक आहे. कॉम्प्युटरवर काम करताना दीर्घकाळ मनगट योग्य स्थितीत टेबलावर न ठेवणे, सतत एकाच हाताने काम करणे, बोटांना आराम न देणे किंवा सतत जड मोबाईल हातात पकडून ठेवणे ही मनगट दुखण्याची कारणे असू शकतात. तुम्ही जर दीर्घ काळ कॉम्प्युटरवर काम करत असाल तर मनगटाला सपोर्ट देणार्‍या माऊस पॅडचा वापर करा. अशा तर्‍हेने काम करताना दोन्ही हातांची ढोपरे शरीराच्या दोन्ही बाजूंना आरामाच्या स्थितीत असली पाहिजेत.

व्यायाम आवश्यक

शरीरातील सर्व भागांत योग्य तर्‍हेने रक्त संचार न होणे हेही मनगट दुखण्याचे कारण असू शकते. नियमित व्यायाम करण्याने रक्तसंचार व्यवस्थित होतो आणि हळूहळू मनगटाच्या ठिकाणी ऑक्सिजनचे प्रमाण वाढू लागते. मनगटाचा हलका व्यायाम त्याच्या आसपासच्या भागातील नसा आणि स्नायूंना लवचिक बनवतो. त्यामुळे वेदनेपासून आराम मिळतो. मनगट एकदा घड्याळाच्या दिशेने आणि एकदा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवल्यानेही वेदनेपासून आराम मिळतो. व्यायाम डॉक्टरांचा सल्ला घेऊन करा.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news