

मुंबई : पुढारी ऑनलाईन
आमचा आणि अयोध्येचा संबंध राजकीय नाही. आम्ही सत्तेत नसतानाही अयोध्येला जात होतो. आमची अयोध्या भेट हे राजकारण नव्हे तर श्रद्धा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सोमय्यांच्या तपासासठी आर्थिक गुन्हे विभाग सक्षम आहे. विक्रांत निधी घोटाळ्याची माहिती बाहेर येईल, असे ते म्हणाले. भाजपच्या सांगण्यायावरून महाराष्ट्र चाललेला नाही, येथे कायद्याचं राज्य आहे. कुणी बाळासाहेबांची कॉपी करत असेल तर आम्ही काय म्हणणार, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, अयोध्याचा संघर्ष होता त्यावेळी आम्ही जात होतो. राम मंदिरासाठी आम्ही लढलो. सध्या न्यायालयाने राम मंदिराचा निर्णय दिला आहे. यावर राजकारण करणे कितपत योग्य आहे. आम्ही शनिवारी हनुमान जयंती निमित्त हनुमान चालिसा पठण केले; पण याचे आम्ही राजकारण केले नाही. मुंबई येथील भारतेश्वरला दुसऱ्या वेव्हिंग डेकच्या उदघाटनासाठी आलेल्या आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे प्रतिपादन केले.