सांगली : नवतंत्रज्ञान पाहून शेतकरी भारावले | पुढारी

सांगली : नवतंत्रज्ञान पाहून शेतकरी भारावले

सांगली; पुढारी वृत्तसेवा : दैनिक पुढारी माध्यम समूह आणि जिल्हा कृषी विभागातर्फे आयोजित अ‍ॅग्री पंढरी या कृषी प्रदर्शनातील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी जिल्हाभरातून शेतकर्‍यांची मोठी गर्दी होत आहे. दुसर्‍या दिवशी रविवारी सकाळी दहापासूनच शेतकर्‍यांची झुंबड उडाली होती. मंगळवार, दि. 19 एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पिछाडीस विजयनगर येथे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनाचे ऑरबिट गु्रप ऑफ कंपनीज् हे प्रायोजक आहेत. रॉनिक स्मार्ट ‘दि कुटे ग्रुप’ सहप्रायोजक, तर ‘केसरी टूर्स’ हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत.

या ठिकाणी फुले, फळे, भाजीपाला तसेच विदेशी भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. प्रामुख्याने वांगे, गवारी, स्वीटकॉर्न, काकडी, कलिंगड, झुकेनी, ढबू, दोडका, घेवडा, बीन्स, कारले, मुळा, दुधीभोपळा, वरणा, विविध वाणांचे झेंडू यांसह 50 पेक्षा अधिक पिकांची
लागवड करण्यात आली आहे. शेतकरी या सर्व पीक प्रात्यक्षिकांची तसेच सर्वच स्टॉल्सवर जिज्ञासूपणाने माहिती घेत होते.

ड्रोनद्वारे औषध फवारणी, गांडूळ खत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, बी-बियाणे, फवारणीची औषधे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पाईपलाईन, शेती पंप, सोलर पंप, शेती विषयक पुस्तके, विविध शासकीय अनुदानाच्या योजना, मल्चिंग पेपर, शेततळे कागद, ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, ब्लोअर, रोप लावणी यंत्रे, रोटावेटर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, दूध काढणी यंत्र, कडबा कुट्टी, सेंद्रिय खते निर्मिती व उत्पादनांचे स्टॉल्स, बँका, पतसंस्थांचे स्टॉल पाहण्यासाठी शेतकर्‍यांची दिवभर गर्दी होती.

Back to top button