

येरमाळा, पुढारी वृत्तसेवा : मलकापूर (जि. उस्मानाबाद) येथील श्री क्षेत्र दत्त मंदीर संस्थानचे एकनाथ लोमटे महाराज यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा येरमाळा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. परळी (जि. बीड) येथील भाविक महिलेने फिर्याद दिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथील एक ३५ वर्षीय भाविक महिला गुरुवारी (दि. २८) दुपारी दोनच्या सुमारास महाराजांच्या दर्शनासाठी आली होती. सभामंडपात महाप्रसादाचा कार्यक्रम सुरु असल्याने ही महिला परिसरातील एका झाडाखाली बसली होती. त्या वेळी महाराजांचा सेवकाकरवी पीडित महिलेस त्यांच्या खोलीत बोलावून घेतले. तिथे गेल्यानंतर त्यांनी यापूर्वी तू आल्यानंतर तुला प्रसाद म्हणून दिलेल्या पेढ्यातून गुंगीचे औषध दिले होते. त्यानंतर तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्याचा व्हिडीओ माझ्याकडे असून आता शरीर संबंध न ठेवल्यास तो व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या वेळी पिडीतेने नकार देताच त्यांनी महाराजांनी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडितेने तेथून धूम ठोकत फिर्याद दिली. या प्रकारानंतर महाराज गायब झाले असून त्यांच्यावर येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.