दुलेचांदगावमध्ये भरदिवसा झाली घरफोडी, अडीच लाख रूपयांची रोकड लंपास | पुढारी

दुलेचांदगावमध्ये भरदिवसा झाली घरफोडी, अडीच लाख रूपयांची रोकड लंपास

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील दुलेचांदगाव येथे भरदिवसा सुमारे अडीच लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांने लंपास करून पोबारा केला आहे. बुधवारी आठवडे बाजारच्या दिवशी दुपारी एक ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. डॉ. संदीप सुखदेव बांगर यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदविला आहे.

डॉ. बांगर आईबरोबर दुलेचांदगाव येथे राहतात. गावात मध्यवर्ती ठिकाणी मुख्य रस्त्यालगत बांगर यांचे घर आहे. पाथर्डी शहरात त्यांचे हॉस्पिटल आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता डॉक्टर आपल्या हॉस्पिटलमध्ये पाथर्डीला आले. आठवडे बाजार असल्याने त्यांची आई दुपारी एक वाजता घराला कुलूप लावून बाजार करण्यासाठी पाथर्डीला आल्या. अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील सामाणाची उचकापाचक करून कपाटामधील दोन लाख चाळीस हजारांची रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली.

डॉ. बांगर यांच्या आई जिजाबाई बाजार करून घरी आल्यानंतर घराच्या समोरील दरवाजाला आतून कडी लावल्याचे त्यांच्या लक्षात आले. घराच्या पाठीमागे जाऊन पाहिले असता, मागील दरवाजा उघडा होता. चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. बुधवारी सायंकाळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाने घटनास्थळी येऊन तपासणी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक के. एस. वाघ करीत आहेत. सध्या पाथर्डी तालुक्यात चोर्‍यांचे सत्र चालूच असून याला वेळेत पोलिसांनी आळा घालून आरोपी अटक करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. तालुक्यात पावसाळ्यातही चोर्‍यांचे सत्र सुरूच आहे.

Back to top button