

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राचा बंगाल करायचा म्हणजे काय करायचे आहे? तेथे खंडणी आणि आंदोलनांमुळे एकही उद्योग टिकला नाही. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रात काय करायचे आहे? तुम्ही नेतृत्व करता त्या सरकारचे मंत्री भ्रष्ट आहेत. काही मंत्र्यांनी तर खंडणीसाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. आयटीच्या छाप्यात हे उघड झाले आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी आज शिवसेनेवर हल्लाबोल केला.
फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचेच होते. मात्र, ते सांगताहेत की, मी चुकून मुख्यमंत्री झालोय. राजकारणात प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असते. ती त्यांनाही होती, म्हणून ते मुख्यमंत्री झाले. आता त्यांनी त्याआड राहून तत्वज्ञान सांगू नये.
ठाकरेंनी मुखवटा बाजुला ठेवावा आणि काम करावे. ते म्हणत आहेत की, आम्हाला महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल करायचा आहे. ठाकरे म्हणतात की, ईडी, सीबीआय बाजूला ठेवून दोन हात करा; पण या यंत्रणा राज्यात का येतात? त्यांना आम्ही आणलेले नाही, उच्च न्यायालयाने आणले. ज्या सरकारचे नेतृत्व करता त्याचे नेतृत्व तुम्ही करता ते भ्रष्ट सरकार आहे. या सरकारचे एकच उद्दिष्ट म्हणजे खंडणी गोळा करणे. बांधावर जाऊन पाहणी करायची आणि पाठ दाखवायची, कर्जमुक्त करतो म्हणून सांगायचे आणि पाठ दाखवाची असे सगळे सुरु आहे. राज्याचे प्रमुख म्हणून तुम्ही इन्कम टॅक्स विभागाच्या छाप्यामधून जे समोर आले ते सांगावे.
सध्या राज्यात प्रचंड दलाली सुरू आहे. ती इतक्या थरावर सुरू आहे. काही मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. किती वसुली करायची हे ठरले आहे, हे छाप्यातून दिसते. ईडी, सीबीआयचे भय कुणाला आहे? ज्यांनी काही केले नाही त्यांनी भय कशाला? आम्हाला राज्य भ्रष्टाचारमुक्त करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या एजन्सीचा गैरवापर करण्याविरोधात आहेत. जर राजकारणासाठी आम्ही हे केले असते तर तुमचे अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात गेले असते. मागच्या सरकारने जसा दुरुपयोग केला तसा आम्ही करणार नाही. भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय पंतप्रधान मोदी गप्प बसणार नाहीत. कालच्या मेळाव्यात केवळ मुख्यमंत्र्यांचे नैराश्य त्यांच्या तोंडातून बाहेर पडत होते. भाजपला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आमच्या पायवाटेवर भक्कम उभारू. आम्ही नंबर एकचे होतो आणि राहू. सरकार पाडून दाखवा असे म्हणतात, आम्हाला आता त्यात इंटरेस्ट नाही. तुम्ही काम करून दाखवा, आव्हान काय देता, असेही ते म्हणाले.