

कोल्हापुरातील ऐतिहासिक छत्रपती राजर्षी शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान (khasbag maidan) कोरोना महामारीमुळे अडीच वर्षे बंद अवस्थेत होते. कोल्हापुरातील सर्व तालमी, कुस्ती मैदान बंद असल्यामुळे युवा पैलवानांना कुस्ती खेळण्यासाठी कोणताही आखाडा मिळत नव्हता.
कोरोना प्रादुर्भाव कमी होत गेला तसतसे आपण पैलवानसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांना व्यायाम करण्यासाठी, स्पर्धा घेण्यासाठी मैदान उपलब्ध केली पाहिजे, हा विचार करून कोल्हापुर कुस्ती मल्लविद्या महासंघाच्यावतीने आपण जगप्रसिद्ध खासबाग मैदानाची पाहणी केली. त्यावेळी सहा फूट उंच असे गवत वाढलं होतं. मोठ्या प्रमाणात मैदानाची दुरावस्था झाली होती. ही गोष्ट कोल्हापूर महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन महासंघातर्फे निवेदन देण्यात आले.
प्रसार माध्यमांनीही या संवेदनशील विषयाची दखल घेतली. प्रशासनाकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. महापालिकेने खासबाग मैदानाची तातडीने स्वच्छता केली.
शुक्रवारी विजयादशमी दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा कुस्ती-मल्लविद्या संघटनेतर्फे खासबाग मैदानात आखाडा पूजन करून कुस्ती मैदानास प्रारंभ करण्यात आला. आखाडा पूजन महापालिकेचे उपायुक्त रविकांत आडसुळ यांच्या हस्ते झाले. या मैदानात प्रातिनिधिक स्वरूपाच्या विना प्रेक्षक कुस्त्या खेळल्या गेल्या. यामध्ये एकूण २५ कुस्त्या झाल्या.
यावेळी वस्ताद पैलवान बाबाराजे महाडिक, आनंदराव पाटील, नारायण गाडगीळ, राहुल भाऊ जाधव, जयवंतराव पाटील दत्तात्रय ठाणेकर, सिद्धेश्वर गायकवाड, सचिन राठोड, युवराज डाफळे, सचिन बिडकर, बाबासो राजगिरे, अमोल पूजारी, गोरखनाथ पाटील इत्यादी कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील तालमीतील युवा पैलवान, वस्ताद मंडळी उपस्थित होते.