

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : महावितरण कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत तालुक्यातील बोर्ले येथील एका शेतकर्याला तुमचे वीजबिल सिस्टीममध्ये अपडेट झाले नाही. ते करण्यासाठी मोबाईलमध्ये क्विक सपोर्ट नावाचे अॅप डाऊनलोड करायला सांगत, त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस घेत त्यांच्या बँक खात्यातून 5 लाख 34 हजारांची रक्कम काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली. ही नुकतीच घटना उघडकीस आली. याबाबत भारत नारायण काकडे (रा. बोर्ले, ता. जामखेड) यांनी शुक्रवारी (दि. 29) नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फसवणुकीची ही घटना 2 ते 12 जूनदरम्यान घडली.
फिर्यादी काकडे यांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या 9883974679 या क्रमांकावर मोबाईल करीत आपण महावितरण मधून बोलत आहोत, आपले वीजबील सिस्टींममध्ये अपडेट झाले नाही, ते अपडेट करुन घेऊ, असे सांगत भारत काकडे यांना क्विक सपोर्ट नावाचे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करायला सांगितले. फिर्यादीने ते अॅप डाऊनलोड केल्यानंतर सदर व्यक्तीने त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस घेत त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून 5 लाख 34 हजार रुपये ऑनलाईन काढून घेतली.
काकडे यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले, तेव्हा त्यांनी जामखेड पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, फसवणूक झालेली रक्कम 5 लाखांपेक्षा जास्त असल्याने जामखेड पोलिसांनी त्यांना नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले.
त्यानुसार त्यांनी शुक्रवारी (दि. 29) दुपारी नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सोनवणे हे करीत आहेत.
हेही वाचा :