

पुढारी ऑनलाईन : येथील हनुमान जयंती निमित्त धार्मिक कार्यक्रमादरम्यान बुधवारी (दि.१२) आयोजित मोटारसायकल रॅलीवेळी हिंसाचाराची घटना घडली. यामध्ये एका महिला पोलिसासह किमान १० पोलीस कर्मचारी जखमी झाले. या घटनेनंतर गुरूवारी (दि.१३) ओडिशातील संबळपूर जिल्ह्यात पुढचे ४८ तास इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने संबलपूर शहरातील प्रमुख भागांमध्ये CrPC चे कलम १४४ लागू केले आहे.
राज्याच्या गृहविभागाने दिलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, कायदा आणि सुव्यस्था ठेवण्यासाठी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. हिंसाचारानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रक्षोभक आणि प्रेरित संदेशांचा प्रसार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ज्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकते. गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून सर्व मोबाइल सेवा प्रदात्यांच्या इंटरनेट/डेटा सेवा, ब्रॉडबँड आणि सोशल मीडिया सेवा निलंबित राहतील, असेही प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
"परिस्थिती गंभीर आहे आणि संबळपूरमधील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासाठी समाजमाध्यमांद्वारे खोटे आणि प्रक्षोभक संदेश प्रसारित करत आहेत," असे गृह सचिव देवरंजन कुमार सिंग यांनी इंटरनेट सेवांवर तात्पुरत्या बंदीचे समर्थन करताना म्हटले आहे.
याआधी, हनुमान जयंती मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला संबळपूरच्या धनुपाली पोलीस स्टेशन अंतर्गत मोतीझारण येथे दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीत किमान १० पोलीस कर्मचारी आणि काही नागरिक जखमी झाले होते. संबलपूर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून १४ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाते. तर देशात सर्वत्र ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाते.