

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पूर्वीच्या काळी लावणीकडे संकुचित वृत्तीने पाहिले जात नव्हते. शाहिरांनी संतांवर, पंढरीवरही लावण्या केल्या आहेत. गेल्या काही वर्षांत कीर्तनकारांनी संसार म्हणजे मिथ्या आहे, शृंगार हा विषय त्याज्य आहे, असा प्रचार केला. परंतु, शृंगाराचाही आस्वाद घेत शांततेकडे जाता आले पाहिजे. शृंगार नाकारणे, लावणीकडे तुच्छतेने पाहणे, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला घातक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
वै. डॉ. रामचंद्र देखणे यांचे योगदान लक्षात घेऊन तसेच त्यांच्या जन्मदिनानिमित्त संतविचार प्रबोधिनीतर्फे 'वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती' पुरस्कारांचे वितरण करण्यात आले, त्या वेळी डॉ. मोरे बोलत होते. 'वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार : कीर्तनकार' वारकरी कीर्तनकार प्रमोद महाराज जगताप यांना, तर 'वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कर : लोककला' लोककलावंत रघुवीर खेडकर यांना प्रवचनकार, कीर्तनकार चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, सचिन ईटकर, डॉ. भावार्थ देखणे या वेळी उपस्थित होते.
देगलूरकर म्हणाले की, देखणे सरांना कोणताही विषय त्याज्य नव्हता. हाती घेतलेले काम ते तडीस न्यायचे. त्यांच्या नावामागे मी जाणीवपूर्वक वैकुंठवासी हा शब्द लावला नाही. कारण, ते वैकुंठाला गेले नाहीत, तर जिथे राहिले तिथेच त्यांनी वैकुंठ निर्माण केला. त्यांचे कार्य खूप मोठे होते.
डॉ. पाटील म्हणाले की, डॉ. देखणे यांची प्राधिकरणात नेहमी भेट व्हायची. त्यांच्याशी गप्पा मारताना वेळ कसा जायचा कळायचा नाही. त्यांनी अनेक बाबतींत सहकार्य केले. देखणे यांच्या घरावर उत्तम संस्कार आहेत. भावार्थ देखणे यांनी वडिलांच्या कार्याची संपूर्ण जबाबदारी सांभाळून देखणे यांच्या कार्याची उंची वाढवली आहे.
जगताप यांनी, देखणे सरांनी बहुरूपी नुसताच मांडला नाही, तर तो जगला, असे सांगितले. तर खेडकर यांनी, कीर्तन आणि तमाशा, ही नदीची दोन टोके आहेत, त्यांना एकत्र आणण्याचे काम देखणे महाराजांनी केले आहे, असे नमूद केले. डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानची घोषणा डॉ. पूजा देखणे यांनी केली आणि उद्घाटन झाले. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.