

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय वंशाच्या ब्रिटनमधील प्राध्यापिका निताशा कौल यांना भारतात प्रवेश नकारण्यात आला आहे. निताशा कौला बंगळुरूमध्ये कर्नाटक सरकारने आयोजित केलेल्या एका परिषदेला उपस्थित राहाणाऱ्या होत्या. पण त्यांना विमानतळावरच रोखण्यात आले, आणि पुन्हा ब्रिटनमध्ये पाठवण्यात आले. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याने मला भारतात प्रवेश नाकारला, असा आरोप कौल यांनी केला आहे. (Nitasha Kaul)
तर दुसरीकडे निताशा कौल यांची पाकिस्तानला सहानुभूती असते, त्यांना परिषदेसाठी बोलवून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय घटनेचा अवमान केला आहे, अशी टीका भाजपने केली आहे.
निताशा कौल या मूळ भारतीय असून त्या काश्मिरी पंडित आहेत. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिनिस्टरमध्ये त्या प्राध्यापक आहेत. भारतीय राज्यघटना आणि राष्ट्रीय ऐक्य या विषयावर कर्नाटक सरकारने आयोजित केलेल्या परिषदेला त्यांना वक्त्या म्हणून बोलवण्यात आले होते. (Nitasha Kaul)
कौल यांनी अमेरिकेतील परराष्ट्र व्यवहार समितीपुढे २०१९ला भारतावर मोठी टीका केली होती. "भारत जम्मू काश्मीरवर सार्वभौमत्व सांगते पण तेथील बहुसंख्याकांनाही दाबले जात आहे आणि अल्पसंख्याकाचे ही रक्षण केले जात नाही. जम्मू काश्मीरमध्ये लोकशाहीतील हक्क आणि अधिकार नाकारले जात आहेत," अशी टीका त्यांनी केली होती. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी नाकारले होते. त्याशिवाय त्यांनी भारतात मुस्लिम आणि ख्रिश्चनांवर अत्याचार होतात, मुस्लिमांचे मॉब लिचिंग करणाऱ्यांचे सरकार सत्कार करते, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
विमानतळावरील अधिकाऱ्यांनी कोणतेही अधिकृत कारण दिलेले नाही, असे कौल यांचे म्हणणे आहे. वरून आदेश असल्याने तुम्हाला भारतात प्रवेश दिला जाऊ शकत नाही, असे कौल यांनी सांगितले.
हेही वाचा