Umesh Kolhe Murder Case : नुपूर शर्माचे समर्थन केल्यानेच अमरावतीच्या उमेश कोल्हे यांची हत्या, एनआयएचे आरोपपत्र

Umesh Kolhe Murder Case : नुपूर शर्माचे समर्थन केल्यानेच अमरावतीच्या उमेश कोल्हे यांची हत्या, एनआयएचे आरोपपत्र
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : अमरावतीतील उमेश कोल्हे (Umesh Kolhe Murder Case) हत्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मुंबईतील एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषितांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या समर्थनार्थ कोल्हे यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टचा बदला घेण्यासाठी ही हत्या घडवून आणल्याचे एनआयएच्या तपासातून निष्पन्न झाले आहे. या आरोपपत्रात सर्व ११ आरोपींची नावे आहेत. यात मुधासिर अहमद, शाहरुख खा, अब्दुल तौफीक शेख, मोहम्मद शोएब, अतीब रशीद, युसूफ खान, इरफान खान, अब्दुल अरबाज, मुशिफिक अहमद, शेख शकील आणि शाहीम अहमद यांचा समावेश असून हे सर्व अमरावतीचे रहिवासी आहेत.

या हत्या प्रकरणाच्या तपासात असे दिसून आले आहे की हल्ल्यासाठी दहशतवादी टोळी तयार करून आरोपींनी गुन्हेगारी कट रचला होता, अशी माहिती एनआयएने दिली आहे. एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, आरोपींनी संगनमताने कृत्य करत कोल्हे यांना घंटाघर, अमरावती येथे सार्वजनिक ठिकाणी घेरले आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांची हत्या केली. या सर्वांवर आयपीसीच्या कलम १२० बी, ३४१, ३०२, १५३-ए, २०१, ११८, ५०५, ५०६ आणि ३४ आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) अधिनियम १९६७ च्या कलम १६, १७, १८, १९ आणि २० अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

कोल्हे खून प्रकरणात पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया अथवा इस्लामिक स्टेट सारख्या कोणत्याही प्रतिबंधित संघटनेचा संबंध नाही, असे एनआयएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण असा संशय आहे की आरोपी स्वत:चं कट्टरवादी होते आणि धर्मनिंदा केली म्हणून त्यांनी शिक्षा देण्यासाठी हिंसक मार्गाचा अवलंब केला.

उमेश कोल्हे यांची हत्या ही एका गटाने रचलेल्या मोठ्या कटाचा भाग होता. ज्यांचा देशात काही लोकांमध्ये दहशत माजवण्याचा उद्देश आहे, असे NIA ने नोंद केलेल्या एफआयआरमध्ये नमूद केले होते. भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह उद‍्गाराचे समर्थन केल्यामुळे उदयपूरपाठोपाठ महाराष्ट्राच्या अमरावती शहरातही एकाचा बळी घेण्यात आला होता.

उदयपूर येथे मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दलच्या वक्‍तव्यावरून नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने कन्हैयालाल यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद उमटत असतानाच अमरावतीतील औषध विक्रेते उमेश कोल्हे (५४) यांची २१ जून २०२२ रोजी अमरावतीत भररस्त्यात अडवून गळा चिरून झालेली हत्याही याच प्रकरणातून झाल्याचे समोर आले. उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर अमरावतीमधील १० जणांना २३,२४,२५ जून, २ जुलै, २ आणि ११ ऑगस्ट रोजी अटक केली होती. तर ज्याच्यावर २ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले होते तो वाँटेड आरोपी शैम अहमद याला २१ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती.

नुपूर शर्माच्या समर्थनार्थ लिहिलेला मजकूर उमेश कोल्हे व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवत होते म्हणून ही हत्या करण्यात आली. अमरावतीच्या कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी जनावरांचा डॉक्टर युसूफ खान बहादूर खान याला अटक केली आणि त्याच्या कबुलीतून नुपूर शर्मा प्रकरणाचा या हत्येशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. नुपूर शर्माला पाठिंबा देणारी पोस्ट लिहिल्यामुळेच कोल्हेंची हत्या झाल्याचे अमरावतीचे पोलीस उपायुक्‍त विक्रम साळी यांनी याआधी सांगितले होते.

कोल्हे हे नुपूर शर्माला पाठिंबा देत असून तसा मजकूर व्हॉट्सअ‍ॅपवर पसरवत आहेत असा मेसेज या डॉक्टर खान यानेच व्हॉट्सअ‍ॅपवर टाकला. त्यातून कोल्हेंच्या हत्येसाठी चिथावणीच दिली गेली होती. (Umesh Kolhe Murder Case)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news