नवे संसद भवन देशातील १४० कोटी नागरिकांच्‍या आकांक्षेचे प्रतीक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवे संसद भवन देशातील १४० कोटी नागरिकांच्‍या आकांक्षेचे प्रतीक : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: प्रत्‍येक देशाच्‍या विकास यात्रेत काही क्षण असे येतात की हे क्षण इतिहासाच्‍या पानात आपला अमीट ठसा उमटवतात. आजचा दिवस ही असाच शुभप्रसंग आहे. आपण हा ऐतिहासिक क्षण देश स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा करत आहोत. भारतीय लोकशाहीचा हा सूर्वणक्षण आहे. नवीन संसद भवन १४० कोटी भारतीयांच्‍या आकांक्षा आणि स्‍वप्‍नांचा प्रतीक आहे. नवे संसद भवन आत्मनिर्भर भारताचा साक्षीदार ‍ठरेल,   असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आज (दि. २८) व्‍यक्‍त केला. नव्‍या संसद भवनाच्‍या लाेकार्पणप्रसंगी ते बाेलत हाेते. (New Parliament Building Inauguration )

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या दुसर्‍या टप्प्यातील कार्यक्रमाची सुरूवात राष्‍ट्रगीताने झाली. यानंतर नवीन संसद भवनाविषयीची चित्रफित सादर करण्यात आले. तसेच ७५ रूपयांच्या नाण्याचे देखील पीएम मोदी यांच्या हस्ते याप्रसंगी अनावरण करण्यात आले.  (New Parliament Building Inauguration)

देशाच्या प्रवासातील ऐतिहासिक क्षण

यावेळी देशवासियांसह उपस्‍थितांना संबोधित करताना पंतप्रधान माेदी म्‍हणाले की,  "प्रत्येक देशाच्या विकासात असे काही क्षण येतात की जे अमर ठरतात. आजचा हा दिवस देखील देशाच्या प्रवासातील ऐतिहासिक क्षण आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वर्ष पूर्ण झाल्याने आज आपला देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. मी या सुवर्णक्षणाच्या भारतीय जनतेला शुभेच्छा देतो. भारतीयांची आकांक्षा आणि स्वप्नाचे प्रतीक म्हणजे हे नवीन संसद भवन (New Parliament Building Inauguration) असेल."

भारत हा जागतिक लोकशाहीचा मोठा आधार

संसदेत पवित्र सेंगोलची स्थापना झाली आहे. नवीन भवन आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाची साक्ष देत आहे. जग भारताकडे नवीन आशेने पाहत आहे. आपली लोकशाही हीच आपली प्रेरणा आहे. भारत हा जागतिक लोकशाहीचा मोठा आधार आहे. जेव्हा भारतात विकास होतो, तेव्हा जग पुढे जाते. लोकशाही केवळ व्यवस्था नाही तर तो एक विचार आणि संस्कार  आहे. संविधान हाच आपला संकल्प आहे, असे देखील मोदी यांनी स्पष्ट केले आहे. (New Parliament Building Inauguration)

नवीन उत्‍साह, नवीन प्रवास

नवीन रस्‍त्‍यांवर वाटचाल करुनच नवीन लक्ष्‍य साध्‍य करता येतात. नवीन उत्‍साह आहे. नवीन प्रवास आहे. नवीन दिशा आहे. नवीन संकल्‍प आहे आमचा नवीन विश्‍वास आहे. आज पुन्‍हा एकदा संपूर्ण जगाचे भारताकडे लक्ष आहे. भारताच्‍या संकल्‍प दृढताकडे आदराने आणि विश्‍वासाने पाहत आहे. संसदेचे हे नवीन भवन भारताबरोबरच विश्‍वाच्‍या विकासाचे आवाहन करेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

नवीन संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी पंतप्रधान एस.डी देवगौंडा, माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रिय मंत्रीमंडळाचे सदस्य, देशातील राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, विविध देशातील भारताचे राजदूत, सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्यायाधीश आदी उपस्थित होते.

नवे संसद भवन अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक : उपसभापती

नवीन संसद भवनाचे लाेकार्पण हा एक अविस्मरणीय क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नातून नवीन संसद भवनाला मृत रूप देण्यात आले आहे. नवीन संसद भवन ही त्रिकोणी आकारातील, चार मजली इमारत आहे. पूर्वीच्या संसद भवनाच्या इमारतीपेक्षा नवीन संसद भवन इमारत ही तीनपट मोठी आहे. संसदेची नवीन इमारत राष्ट्रपक्षी 'मोर' या थीमवर आधारित आहे. ही इमारत अत्याधुनिक दृकश्राव्य माध्यमाने सज्ज आहे. तसेच आधुनिक मतदान सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवीन संसद भवनाची इमारत ही पर्यावरणपूरक आहे, अशी माहिती राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांनी या वेळी दिली.

चर्चात्मक वातावरणात नवीन भारत बनवू : ओम बिर्ला

स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आहोत. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ही इमारत बांधणारे श्रमिक यांचे मी आभार व्यक्त करतो. भारत जगातील प्राचीन संसदीय लोकशाही प्रधान देश आहे. भारत ही लोकशाहीची जननी आहे. यामुळे देशभरातील भारताचा सन्मान वाढला आहे. भारताची संसद अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे, त्यामुळे ते जपणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. नवीन संसद भवनात सिंगोल रोवून एक इतिहास रचला आहे. मला विश्वास आहे की, आपण सर्वजण मिळून या नवीन संसद भवनात नव्या उर्जेने रचनात्मक आणि चर्चात्मक वातावरणात नवीन भारत बनवू, असे मत ओम बिर्ला यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news