

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेत सॉफ्टवेअर कंपनी चालवणाऱ्या नेविल रॉय सिंघम या उद्योगपतीने चिनी प्रोपागंडा चालवण्यासाठी भारतात आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे, असा सनसनाटी खुलासा न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने केला आहे. चीन सरकारच्या नियंत्रणातील माध्यमांची बाजू पोहोचवणे, रशियन साम्राज्यवादाची भलामण करणे, उईघूर मुस्लिमांच्या वंशसहाराच्या बातम्यांचे खंडन करणे अशा प्रकारची कुरापती सिंघमच्या माध्यमातून होत होत्या, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे.
सिंघमच्या नेटवर्कमधून दिल्लीतील वृत्तसंस्था न्यूज क्लिकला फंडिंग मिळाले होते, असे या बातमीत म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यावर सविस्तर वृत्त दिले आहे. न्यूज क्लिकमधून चिनी सरकाराला पुरक अशा बातम्या पेरल्या जात होत्या, असे या म्हटले आहे. सिंघमशी संबंधित नेटवर्कमधून युट्यूब व्हिडिओ बनवले जात होते आणि त्या माध्यमातूनही चीनच्या बाजूने प्रचार केला जात होता.
या नेटवर्कमध्ये अमेरिकीत काही एनजीओ महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत, यांच्या माध्यमातून शेल कंपन्या आणि धर्मादाय संस्था यांचे जाळे विणण्यात आले आहे. यातील No Cold War सारख्या काही संस्थांचे कोणतेही कायदेशीर अस्तित्व नाही. तसेच सिंघम यांच्या एकाही संस्थेने अमेरिकीतील फॉरेन एजन्ट रजिस्ट्रेशन अॅक्टनुसार नोंदणी केलेली नाही. युनायटेड कम्युनिटी फंड, जस्टिस अँड एज्युकेशन फंड अशा चार संस्थांचे कोणतेही प्रत्यक्षात अस्तित्व नाही, तर यातील एक संस्था सिंघमची बायको जुडी इव्हान्स चालवत होती.
पीपीएल न्यूज क्लिक फंडिंग प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना ११ जानेवारी २०१८ला झाली आहे. यामध्ये सिंघमच्या एका कंपनीने ९.५९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, असे News 18 या वेबसाईटने म्हटले आहे. त्यानंतर सिंघमी संबंधित चार कंपन्यांकडून न्यूज क्लिकला वेळोवेळी फंडिंग मिळाले आहे.
या प्रकरणावर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "आम्ही न्यूज क्लिकबद्दल पूर्वीही बोललो होतो. काँग्रेस, चीन आणि न्यूज क्लिक एकाच कटाचे भाग आहेत. हा प्रोपागंडा भारताला तोडण्यासाठी आहे."
हेही वाचा