

यूजीन (अमेरिका); पुढारी ऑनलाईन : ऑलिम्पिक गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. अमेरिकेतील यूजीन येथे झालेल्या चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये नीरजने 88.13 मीटर दूर अंतरावर भालाफेक करत रौप्यपदक पटकावले. विजयानंतर नीरज चोप्राने सांगितले की, वाऱ्यामुळे काहीसा त्रास झाला. पण मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. स्पर्धा कठीण होती, शिकण्यासारखं खूप होतं, अशी भावना त्याने व्यक्त केली.
नीरज चोप्रा (Neeraj Chopra) म्हणाला, 'मी नेहमीच म्हणत आलो की प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो. शाब्बास पीटर्स, आज पीटर्सचा दिवस होता. ऑलिम्पिकबद्दल बोलायचे झाले तर पीटर्स अंतिम फेरीतही पोहोचू शकला नाही. प्रत्येक खेळाडूसाठी हे खूप आव्हानात्मक असते, प्रत्येक खेळाडूची शरीर रचनाही वेगळी असते. कोणाचीही कधीही तुलना होऊ शकत नाही. मी खूप प्रयत्न केले. खडतर स्पर्धा होती. आजच्या सामन्यातून खूप काही शिकायला मिळाले.'
रौप्य पदक आनंद देणारे आहे. आजच्या खेळासाठी वेगळी रणनीती नव्हती. पात्रता फेरीत चांगला थ्रो झाला. पण प्रत्येक दिवस वेगळा असतो. आपल्याला नेहमी वाटते तसे निकाल मिळत नाहीत, परंतु ही एक कठीण लढत होती, सुरुवात खराब झाली पण मी रौप्यपदक जिंकण्यात यशस्वी झालो, असे चोप्राने (Neeraj Chopra) सांगितले.
अँडरसन पीटर्सचा थ्रो खूप चांगला होता. आजची परिस्थिती माझ्यासाठी वेगळी होती. पण मला वाटले की थ्रो ठीक आहे, मी माझ्या थ्रोने खूश आहे. प्रत्येक वेळी सुवर्ण पदक जिंकता येत नाही. खेळात नेहमीच चढ-उतार असू शकतात. पण मी नेहमीच माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन,' असा विश्वासही निरज चोप्राने ब्लून दाखवला.
39 वर्षीय जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. निरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पण तब्बल 19 वर्षांनंतर या चॅम्पियनशिपमध्ये देशाला पदक मिळाले आहे. नीरजच्या आधी अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. या चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू तसेच पुरुष खेळाडू ठरला आहे.