

पुढारी ऑनलाईन डेस्क : Neeraj Chopra, World Athletics Championships : ऑलिम्पिक गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्राने अमेरिकेतील यूजीन येथे खेळल्या जात असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकले आहे.
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने यूजीन (अमेरिका) येथे 18व्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. त्याने 88.13 मीटर भालाफेक करून हे पदक मिळवले. गोल्ड ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सने 90.46 मीटर दूर भाला फेकून सुवर्ण पदक जिंकले. भारताचा रोहित यादवही याच स्पर्धेत होता. त्याने 78.72 मीटर दूर भाला फेकून तो 10व्या स्थानावर राहिला.
नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल होता. त्यानंतर दुसऱ्या थ्रोमध्ये नीरजने 82.39 मीटर, तिसऱ्या थ्रोमध्ये 86.37 मीटर, चौथ्या प्रयत्नात 88.13 मीटर दूर भाला फेकला, तर पाचव्या प्रयत्नात तो अपयशी ठरला. अंतिम फेरीतील त्याची सर्वोत्तम कामगिरी 88.13 मीटर राहिली. त्यामुळे दुसरे स्थान कायम राखत त्याने रौप्यपदक जिंकण्यात यश मिळवले.
जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या अँडरसन पीटर्सने पहिल्या थ्रोमध्ये 90.21 मीटर फेक करून आश्चर्यकारक कामगिरी केली, तर दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने 90.46 मीटर फेक करून आपले स्थान मजबूत केले. पीटर्सने 90.21, 90.46, 87.21 आणि 88.12 मीटर अंतरावर भालाफेक करत आपली आघाडी कायम ठेवली.