

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी कमालीचा वेग घेतला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे ४० आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगू लागल्या आहेत. यातूनच राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर तर्क-वितर्क लढवलले जात आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक या सोशल साईटवरील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो असलेला कव्हर पेज हटवले आहे; पण ट्विटर आणि फेसबुक बायोमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा बदल करुन अजित पवार काय इशारा करत आहेत, यावरुन राजकीय वर्तूळासह सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. (NCP Ajit Pawar)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याबाबत मागील काही दिवसांपासून विविध राजकीय चर्चा रंगत आहेत. असे असतानाच अजित पवार यांनी सोमवारी (17) दिवसभरात आयोजित केलेले सर्व कार्यक्रम अचानक रद्द केले होते. त्यानंतर राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे. याबाबत भाजप नेते व अजित पवार यांच्या काही गुप्त बैठकाही झाल्याची चर्चा सध्या राज्यात रंगली जावू लागली. त्यानंतर अजित पवार यांनी आपण तब्येत बरी नव्हती म्हणून विश्रांतीसाठी घरीच होतो, असे स्पष्टीकरण दिले.
अजित पवार भाजप सोबत जाणार किंवा अजित पवार नॉट रिचेबल अशा प्रकारच्या अनेक बातम्या येत आहेत. या सर्व बातम्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर आपली पहिली प्रतिक्रिया आज माध्यमांना दिली आहे. ते म्हणाले, "या सर्व फक्त तुमच्या मनातील चर्चा आहेत. अजित पवार यांच्याविषयीच्या सर्व बातम्या खोट्या आहेत."
अजित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक या सोशल साईटवरील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो असलेला कव्हर पेज हटवले आहे; पण ट्विटर आणि फेसबुक बायोमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा बदल करुन अजित पवार काय इशारा करत आहेत यावरुन राजकीय वर्तूळासह सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. आता अजित पवारांची भूमिका काय असेल आणि महाराष्ट्रातील राजकारणाला कोणतं वळण मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
दरम्यान. सध्याच्या राजकीय घडामोडीवर अजित पवार यांनी खुलासा केला आहे. माझ्याबद्दल ज्या काही नाराज असल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी चालविल्या जात आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही, असा खुलासा अजित पवार यांनी आज विधान भवनात पत्रकार परिषदेत केला. सकाळपासून अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केल्यानं राजकीय तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला.
कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत. माझ्या सहकाऱ्यांबद्दलही गैरसमज पसरविले जात आहेत. ४० आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. मी राष्ट्रवादीतच राहणार आहे. भाजपसोबत जाण्याबाबतच्या चर्चा निराधार आहेत अस त्यांनी सांगितलं.
हेही वाचा :