

मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या मोठ्या जहाजावर एनसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई (दि.०३) मध्यरात्री करण्यात आली आहे. मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या एका जहाजामध्ये ड्रग्ज पार्टी होणार असल्याची खात्रीशीर माहिती एनसीबीच्या हाती लागली होती. या आधारावर एनसीबीच्या एका पथकाने प्रवासी बनत त्या जहाजामध्ये प्रवेश मिळवला होता. दरम्यान ही जहाज समुद्रात गेल्यानंतर काही वेळात कारवाईला सुरूवात केली. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कार्डेलिया या जहाजावर ग्रीन गेटजवळ ही कारवाई करण्यात आली. (NCB raids drug party)
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली आहे. तब्बल सात तासांपासून ही कारवाई सूरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान जहाज समुद्राच्या आतमध्ये गेल्यावर ड्रग्ज पार्टीला सुरूवात झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा वापर होत असल्याचे निर्दशनास आल्यावर एनसीबीकडून कारवाईस सुरूवात झाली. एनसीबीचे पथक प्रवासी बनून गेल्याने या कारवाईचा मागमुस कोणालाही लागला नसल्याने सर्व संशयितांना रंगेहाथ पकडण्यात मदत झाली.
दरम्यान, एनसीबीने या कारवाईत बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलालाही ताब्यात घेतल्याचे समजते आहे. याचबरोबर यामध्ये अन्य १० जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. एनसीबीकडून पहिल्यांदाच जहाजावरील ड्रग्ज पार्टीची मोठी कारवाई केल्याने याची जोरदार चर्चा होत आहे.
कॉर्डेलिया या २००० प्रवासी क्षमतेच्या जहाजावर २ व ३ ऑक्टोबरसाठी मुंबई-गोवा-मुंबई ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते. या क्रूझवर उच्चभ्रूंचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्यात ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई पथकाला मिळाली.
आज रात्री गोव्याला जाऊन ते सोमवारी सकाळी परत मुंबईला येणार होते. त्यासाठी आयोजकांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागविले होते. एनसीबीच्या पथकाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून क्रूझ ग्रीन गेटजवळ थांबले असताना छापा मारल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या पार्टीमध्ये सर्व आरोपींना मुंबईत चौकशीसाठी आणणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या सात तासांपासून एनसीबीचे पथक भर समुद्रात ही कारवाई करत आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर कोकेन आणि एमडी जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.