RR Vs CSK : चेन्नईसमोर राजस्थानच ‘रॉयल’ | पुढारी

RR Vs CSK : चेन्नईसमोर राजस्थानच ‘रॉयल’

अबुधाबी : वृत्तसंस्था : शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकांच्या जोरावर (RR Vs CSK) राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जवर सात गडी राखून सहज विजय मिळवला. राजस्थानच्या विजयाने चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडची शतकी खेळी व्यर्थ ठरली.

विजयासाठी 190 धावांचा पाठलाग करताना राजस्थानने दमदार सुरुवात केली. सलामवीर एविन लेविस आणि यशस्वी जैस्वाल यांनी आश्वासक सुरुवात करून दिली. जैस्वालने 21 चेंडूंत अर्धशतके ठोकले. लेविसने 27 धावा केल्या. सॅमसन 28 धावा करून बाद झाला. दुबे याने 42 चेंडूंत नाबाद 64 धावांची खेळी करत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या खेळीत त्याने चार षटकार आणि चौकार मारले. राजस्थानच्या विजयामुळे प्लेऑफमधील संघर्ष वाढला आहे.

तत्पूर्वी, ऋतुराज गायकवाडने पहिल्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून यंदाच्या आयपीएलच्या दुसर्‍या सत्रातील पहिले शतक ठोकले. तसेच ऋतुराजचे आयपीएल आणि टी-20 क्रिकेटमधीलही हे पहिले शतक ठरले. त्याच्या नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नईने राजस्थानसमोर विजयासाठी 190 धावांचे कडवे आव्हान ठेवले.

नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि फा-डू-प्लेसिस यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली.

एका बाजूने ऋतुराज आक्रमक फलंदाजी करत संघाच्या धावसंख्येत भर घालत होता. मोईन अलीनेसुद्धा आक्रमक फटकेबाजी केली. ऋतुराजने 43 चेंडूंत अर्धशतक झळकावले. मोईन अली 21 धावा करून बाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजानेही 15 चेंडूंत 32 धावा केल्या. राजस्थानकडून राहुल तेवतिया याने तीन विकेटस् घेतल्या.

संक्षिप्त धावफलक RR Vs CSK

चेन्नई सुपर किंग्ज : (20 षटकांत 4 बाद 189) ऋतुराज गायकवाड नाबाद 101, रवींद्र जडेजा नाबाद 32. राहुल तेवतिया 3/39.

राजस्थान रॉयल्स (17.3 षटकांत 3 बाद 190) शिवम दुबे नाबाद 64, यशस्वी जैस्वाल 50, शार्दूल ठाकूर 2/30.

Back to top button