सिंहायन आत्मचरित्र : आबांचा अमृतमयी सत्कार | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : आबांचा अमृतमयी सत्कार

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव, मुख्य संपादक, दैनिक पुढारी

गतवर्षी पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमा प्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

– संपादक, बहार पुरवणी

‘पितृ देवो भवः!’

तैत्तिरीय उपनिषदातील या सुभाषिताचा अर्थ ‘पिता हा देवासमान असतो’, असा आहे. मुळात ‘पिता’ हा शब्दच ‘पा रक्षणे’ या धातूपासून तयार झालेला आहे. ‘यः पाति स पिता’ म्हणजे ‘जो आपलं रक्षण करतो,’ तो पिता होय. पुत्र प्राप्तीनंतर पित्याला अवर्णनीय आनंद होत असतो. कारण तो पुत्रामध्ये आपलं ‘प्रतिरूप’च शोधत असतो.

सामवेदात स्पष्ट म्हटलंय की, ‘हे पुत्र, तू माझ्या अंगांगातून उत्पन्न झाला आहेस. तुझं तेज, तन आणि मनसुद्धा माझ्या अणूरेणूतूनच झालेली निर्मिती आहे. म्हणून तू माझा आत्माच आहेस.’

आणि म्हणूनच आपल्या पुत्राची उत्तरोत्तर होणारी प्रगती पाहून, पुत्र आपल्यापेक्षाही मोठा होतोय हे पाहून, पित्याला त्याची कधीच असूया वाटत नाही. उलट त्याला आपल्या पुत्राचा अभिमानच वाटत असतो. म्हणूनच ‘पिता हा देवासमान असतो’, हे तैत्तिरीय उपनिषदातील सुभाषित एकदम खरं आहे.

निदान माझ्या आबांच्याकडे बघत असताना तरी ते मला शंभर टक्के खरं वाटतं. आबांनी माझ्यावर निर्व्याज प्रेम केलं. मला आपल्याकडचं जे जे उत्तम ते ते सारं दिलं. एका क्षणी त्यांनी मला आपला आत्माच देऊन टाकला! कारण ‘पुढारी’ हा त्यांचा आत्माच होता. तो त्यांनी मला बहाल केला आणि माझ्यावर विश्वास टाकून ते निवांत झाले.

‘पुढारी’ची माझ्या हातून होणारी प्रगती पाहून आणि मी स्वतः शनैःशनैः मोठा होताना पाहून त्यांना माझं कौतुकच वाटत आलं. त्यामुळे ‘पितृृ देवो भवः’, या सुभाषिताचा गौरव करणारं माझ्या आबांचं व्यक्तिमत्त्व आहे, असं म्हटलं तर ते मुळीच अतिशयोक्तीचं होणार नाही. माझी आणि पर्यायानं ‘पुढारी’ची होणारी प्रगती डोळे भरून बघता बघता त्यांच्या आयुष्याचा प्रवास पंचाहत्तरीपर्यंत कधी नि कसा येऊन पोहोचला; हे मलाच काय, त्यांनाही उमजलं नाही.

आणि त्यांना ते उमजणार तरी कसं? उभ्या आयुष्यात आबांनी आपला वाढदिवस कधी साजराच केला नव्हता! वाढदिवसच काय, त्यांनी स्वतःसंबंधीचा कुठलाच कार्यक्रम कधी साजरा केला नाही. दुसर्‍याचे वाढदिवस लक्षात ठेवून, ‘पुढारी’मधून त्यांचं अभीष्टचिंतन करणारे आबा, स्वतःचा वाढदिवस मात्र नेहमीच विसरून जायचे.

पण आता हा साधासुधा वाढदिवस नव्हता. ही तर त्यांची पंचाहत्तरी होती! हा अमृतमहोत्सवी योग ते स्वतः जरी विसरले, तरी आम्ही आणि त्यांनी आयुष्यभर ज्यांच्यावर नितांत प्रेम केलं, ती त्यांची जिवलग मित्रमंडळी आणि त्याहूनही कोल्हापूरची जनता कसं काय विसरू शकणार होती?

आबांचा जन्म 4 मे 1908 चा. त्यामुळे 1982 हे त्यांचं अमृतमहोत्सवी वर्ष. परंतु, आबा हे प्रसिद्धीलोलुप नाहीत आणि आपल्या हयातीत ते कोणताही व्यक्तिगत कार्यक्रम साजरा करणार नाहीत, हे लोकांच्या लक्षात आलेले. एक तर आबांच्यावर लोकांचं प्रचंड प्रेम. त्यातून त्यांच्या जिवलग मित्रांचं जाळं महाराष्ट्रभर पसरलेलं. अगदी वृत्तपत्र क्षेत्रापासून समाजकारण आणि राजकारणातील नेत्यांपर्यंत त्यांचं नेटवर्क विणलं गेलेलं. त्यांच्या मृदू, प्रेमळ आणि सच्छील स्वभावामुळे लोकांना ते ‘देवमाणूस’च वाटायचे!

त्यांचे एक सत्यशोधक मित्र संपूर्ण निरीश्वरवादी होते. आबाही सुरुवातीच्या काळात सत्यशोधक चळवळीमुळे काहीसे निरीश्वरवादीच होते. परंतु, आयुष्याच्या सायंकाळी ते हळूहळू अध्यात्माकडे वळले.आबांच्या बरोबर दररोज फिरावयास जाणारे आबांचे गगनबावड्याचे एक धार्मिक वृत्तीचे भांबुरे म्हणून मित्र होते. ते आबांना फार मानायचे. आबा त्यांच्या द़ृष्टीने त्यांचे वडीलधारी होते. आबांनाच ते देवाच्या ठिकाणी मानायचे! ते नेहमी आबांना म्हणायचे,

“‘पुढारी’ हीच माझी ‘पंढरी’ आणि तुम्ही माझे ‘विठ्ठल’!
आणि मग,
‘तुझे रूप पाहता देवा! सुख झाले माझ्या जीवा ।
हे तो वाचे बोलवेना । काय सांगो नारायणा ॥’
या तुकारामांच्या अभंगातील काव्यपंक्तीही म्हणून दाखवायचे. मग आबा हसत हसत त्यांना म्हणायचे,
“एकदा पंढरपूरला जाऊन या! म्हणजे तुमचा भ्रमनिरास होईल!”
असं हे आगळंवेगळं मैत्र! मग आता ही मित्रमंडळी त्यांचा अमृतमहोत्सव साजरा केल्याशिवाय कशी राहतील?

आबा मनोवृत्तीने उतरत्या वयात जणू तुकाराममयच झाले होते. त्यामुळे जेव्हा मी त्यांच्याकडे हा विषय काढला, तेव्हा त्यांनी विरोधच केला.
“हे बघ बाळ, मला असले सोपस्कार अजिबात आवडत नाहीत. माझा वाढदिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात, जाहीरपणे व्हावा, एवढा मोठा मी नाही!” त्यांनी ठामपणे नकारच दिला.

“आबा, तुम्ही किती मोठे आहात, हे लोकांनी ठरवायचं! तुम्हाला तुमचं मोठेपण कसं दिसणार? ते लोकांना दिसत असतं!” मी समजावत म्हणालो.
“पण मला हे पटत नाही!” त्यांचा नकार कायम होता.
“आबा, लोकांचं प्रेम आहे तुमच्यावर! कारण तुम्हीही त्यांच्यावर तसंच प्रेम केलंय! त्याची उतराई म्हणून त्यांना ते करायचंय! त्यांना विरोध करून नाराज करणार आहात काय?” मी म्हणालो.
त्यावर आबा निरुत्तर झाले आणि त्यांची ती मूक संमतीच समजून आम्ही सर्व जण कामाला लागलो.

अमृतमहोत्सवी आबा

अखेर त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्याचा संकल्प कोल्हापूरच्या जनतेनं सोडला. जवळजवळ पाच तपं आबांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आणि पत्रकारितेत वैशिष्ट्यपूर्ण आणि मोलाचं योगदान दिलं. महाराष्ट्राच्या जडणघडणीतही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांचा मोठा हातभार लागला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत पत्रकारितेत त्यांची लेखणी तळपलेली. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालून ते प्रश्न मार्गी लावण्याची कामगिरी त्यांच्या लेखणीनं निःस्पृहपणे बजावलेली. लोकशाहीचा चौथा स्तंभ त्यांनी जीवाभावानं जपलेला. त्यातूनच त्यांचं सामान्यांशी अतुट नातं जोडलं गेलेलं.

आबांचं जीवनकार्य हे असं अलौकिकच! सामान्य परिस्थितीतून पुढे येऊन त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं. असं अपार कर्तृत्व करीत असतानाच आपल्या शालीन, मृदू व्यक्तिमत्त्वाचा प्रभावही त्यांनी निर्माण केला. ते टीका करीत; पण आपल्या टीकेनं कुणी दुखावला जाणार नाही, याची काळजीही घेत. त्यामुळेच अजातशत्रू म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. एवढी अफाट कर्तबगारी अन्य कोणाची असती, तर त्याला आभाळ ठेंगणं झालं असतं. आपल्या कर्तबगारीचा त्यानं चहूमुलुखी डंका पिटला असता. परंतु आबांनी कधीही प्रसिद्धीचा सोस बाळगला नाही. ते प्रसिद्धीपराङ्मुखच राहिले.

एवढं मोठं वृत्तपत्र हाती असतानाही, त्यांनी त्यामध्ये कधी स्वतःची बातमी किंवा फोटोही येऊ दिला नाही. खरं तर आपल्या पत्नीवर लिहिलेल्या कविता ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध कराव्यात, यासाठी गळ घालणारे राजकीय नेतेही आबांनी पाहिले होते आणि आबांकडे तर अख्खा ‘पुढारी’च होता, तरीही ते अविचल राहिले. प्रसिद्धीपराङ्मुखतेचं स्वीकारलेलं व्रत त्यांनी कधीच सोडलं नाही.

आनंदाचे डोही आनंद तरंग

माझं आबांच्यावर उत्कट प्रेम. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच माझी पत्रकारिता फुललेली. साहजिकच आबांचा अमृतमहोत्सव ही माझ्या जीवनातील महत्त्वाची घटना. आबांना मात्र हा समारंभ नकोच होता. स्वतःबद्दलचा असा जाहीर कार्यक्रम टाळावा, अशीच त्यांची इच्छा होती. एकीकडे प्रसिद्धीपराङ्मुखता, तर दुसरीकडे वयोमानानुसार आलेले शारीरिक निर्बंध. तरीही सर्वांनी त्यांना खूपच आग्रह केल्यामुळे ते कसेबसे या कार्यक्रमासाठी तयार झाले. आबांच्या पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत. चालताना त्यांना त्रास होई. ते काठी घेऊन चालत. त्यामुळे त्यांना कोणतीही दगदग नको वाटे. पण सर्वांनी आबांच्या मनाची तयारी करवून घेतली आणि मग…

‘आनंदाचे डोही आनंद तरंग ।
आनंदचि अंग आनंदाचे ॥’

अशीच सर्वांच्या मनाची अवस्था झाली होती. पन्नास वर्षांहून अधिक काळ मराठी पत्रसृष्टीत ‘पुढारी’कारांनी आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलेलं होतं. त्यांनी अनेकांना घडवलं, आकार दिला. त्यामुळे त्यांच्या अमृतमहोत्सवासाठी सारा कोल्हापूर जिल्हाच कामाला लागला. ज्येष्ठ नेते भाई माधवराव बागल यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, महापौर, आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि सदस्य, उद्योगपती, सहकार क्षेत्रातील नेते यांच्यासह शिक्षण, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची एक व्यापक – विशाल गौरव समिती स्थापन करण्यात आली.

पत्रकाराला पत्रकार म्हणून काही वेगळं स्वातंत्र्य आहे, असं आबा मानत नव्हते. घटनेनं सर्वसामान्य नागरिकांना जे आचार-विचार आणि भाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे, तेवढेच पत्रकारालाही आविष्कार स्वातंत्र्य आहे, असं त्यांचं ठाम मत होतं. त्यामुळे आबा टीका करीत ती सौम्य असे आणि सुधारणा व्हावी, याच तळमळीतून असे. मात्र, माझं लिखाण हे सडेतोड, कुणाचाही मुलाहिजा न ठेवता आक्रमकपणे केलेलं. आम्हा दोघांतील हा मूलभूत फरक होता. दोघांची वैचारिक नाळ एक असली तरी पिंड मात्र वेगळा होता.

सोहळ्याआधीचे ‘कृतज्ञ’ सोहळे

प्रत्यक्षात 29 मे, 1982 रोजी प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं; पण सत्काराच्या मुख्य सोहळ्याआधीच याच सोहळ्याच्या निमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित करून आबांच्याविषयीची कृतज्ञता कोल्हापूरकरांनी व्यक्त केली होती. तांबड्या मातीनं रंगला नाही, तर तो कोल्हापुरी सोहळा कसला? त्यामुळे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघानं, खासबाग मैदानात कुस्त्यांचं जंगी मैदान घेऊन आबांच्या अमृतमहोत्सवाची दिमाखदार सुरुवातच केली. तसेच 27 मे रोजी ऑटो सायकल रेसची चित्तथरारक स्पर्धाही मोठ्या उत्साहात पार पडली. आबांच्या अमृतमहोत्सवाचं वातावरण आधीपासूनच तापायला सुरुवात झाल्याचेच हे संकेत होते.

आबांची उमेदीची हयात कोल्हापूरच्या शुक्रवार पेठेतच गेलेली. त्यामुळे त्या प्रभागाला आबांचा फार अभिमान. ते ध्यानी घेऊन आणि आबांच्या अमृतमहोत्सवाचं औचित्य साधून, महापालिकेनं शुक्रवार पेठेतील गुणे बोळात असलेल्या मराठी प्राथमिक शाळेला आबांचं नाव द्यायचा निर्णय घेऊन तो अंमलातही आणला. त्या शाळेचं नामकारण “पुढारी’कार ग. गो. जाधव विद्यालय,’ असं करण्यात आलं.

महापालिकेचा मानाचा मुजरा

अमृतमहोत्सवाच्या पूर्वसंध्येला 28 मे रोजी आबांचा कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे मानपत्र देऊन गौरवही करण्यात आला. जणू कोल्हापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेनं, कोल्हापूरच्या जनतेच्या वतीनं आबांना केलेला तो मानाचा मुजराच होता. हा अविस्मरणीय समारंभ कोल्हापूरची शान असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. असं मानपत्र दिले जाणारे आबा हे करवीरचे पहिलेच सुपुत्र होय.

“अनेक मोठी माणसं ‘पुढारी’कारांनी घडवली,” असे उद्गार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी काढले, तेव्हा केशवराव भोसले नाट्यगृह टाळ्यांच्या कडकडाटानं दणाणून गेलं. परंतु, आबांची भावावस्था संत तुकारामांच्या भावावस्थेसारखीच झाली होती. आबा आयुष्याच्या अखेरच्या काळात तुकारामांच्या तत्त्वज्ञानाशी तादात्म्य पावले होते, ही वस्तुस्थिती होती!

अमृतसिद्धीचा ‘अमृतक्षण’

अमृतमहोत्सवाची जय्यत तयारी झाली. कार्यकर्त्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. 29 मे रोजी दुपारपासूनच प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर तुफान गर्दी झाली होती. गावोगावचे लोक अक्षरशः बैलगाड्या जुंपूनच आले होते. व्यासपीठावर तर सर्वपक्षीयांचीच मांदियाळी होती. या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण. आबांचं आणि त्यांचं तीन तपांचं मैत्र!

आबांचा गौरव करताना यशवंतराव चव्हाण म्हणाले, “वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. याचं सतत अवधान ठेवून निष्ठेनं पत्रकारितेचं व्रत यशस्वीरीत्या पेलणारे अजातशत्रू संपादक म्हणजे ‘पुढारी’कार ग. गो. जाधव!”

यशवंतरावांच्या या गौरवपूर्ण उद्गारानंतर संपूर्ण प्रेक्षामंडप टाळ्यांच्या गजरानं दुमदुमून गेला. यशवंतराव आपल्या भाषणात जे म्हणाले, ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे. पत्रकार आणि राजकारणी यांच्यात फरक करणे कठीण असल्याचं सांगून यशवंतराव पुढे म्हणाले,

“लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांनी पत्रकारिता आणि राजकारण हे दोन्ही तराजू व्यवस्थित पेलले होते. त्याचप्रमाणे ‘पुढारी’नेही जनतेची विश्वासार्हता कधी गमावली नाही. ‘पुढारी’ची विश्वासार्हता कायम आहे, म्हणूनच प्रचंड संख्येनं नागरिक आज येथे ‘पुढारी’कारांच्या सत्कारासाठी आलेले आहेत.”

“खरं म्हणजे वृत्तपत्र सुरू करणे आणि ते चालवणे महाकठीण काम! मी अनेक वृत्तपत्रं काढली आणि ती इतिहासजमा झाली. ‘पुढारी’कारांनी मात्र वृत्तपत्र यशस्वीरीत्या सर्वसामान्य जनतेपर्यंत नेऊन पोहोचवलं आहे. कोल्हापूर संस्थान विलीनीकरणानंतर मुख्य प्रवाहात सामील झाल्यापासून, मी ‘पुढारी’कारांना जवळून ओळखतो आहे.”

बहुजन समाजाला राष्ट्रीय प्रवाहात जोडलं

आबांच्या निर्भयतेबाबत बोलताना यशवंतराव पुढे म्हणाले, “ब्राह्मणेतरांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्थान आहे की नाही, असा सवाल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ऐन तारुण्यात विचारणारे निर्भय संपादक ते हेच! याच ग. गो. जाधव यांनी महात्मा गांधींची मुलाखत घेऊन बहुजन समाजाला काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीशी जोडलं! त्यामुळेच बहुजन समाज आज सत्तेत आहे.

वैयक्तिक निंदानालस्ती अन् कटुता यांना सर्वस्वी फाटा देऊन निखळ राष्ट्रवादी द़ृष्टिकोनातून लोकशिक्षणाचं काम करणार्‍या थोर माणसाचा, एका राष्ट्रभक्ताचा आणि निर्भीड संपादकाचा आज इथं यथोचित सत्कार होत आहे; याचा मला अपार आनंद होत आहे. असा देदीप्यमान सोहळा अन्यत्र होणे कठीण! पुण्यात तर होणे नाही!” अमृतमहोत्सवानिमित्त संपादित केलेल्या गौरवग्रंथाचं प्रकाशन, समाजवादी नेते ना. ग. गोरे यांच्या हस्ते  झालं. गोरे यांनीही आपल्या भाषणात आबांची मुक्तकंठानं प्रशंसा केली.“

‘कैवारी’पासून पत्रकारितेचा शुभारंभ करणारे ग. गो. जाधव आज ‘पुढारी’चे संपादक आहेत. अखंड निष्ठा, निर्भीड बाण्याशी तडजोड न करता ‘पुढारी’कारांनी लोकशाही वृत्ती सांभाळली. हे प्रकारे संताचेच लक्षण आहे. कोणाविषयी तुच्छता, कुत्सित बुद्धी न ठेवता लोकांना शहाणे करावे या वृत्तीने कार्य करणारे ते जन्मजात संपादक आहेत!” असे गौरवोद्गार ना. ग. गोरे यांनी काढले.

‘राष्ट्रवादी भूमिकेतून कुणाचीही गय न करणारे निर्भीड संपादक’, अशा शब्दांत सोहळ्याचे अध्यक्ष वसंतदादा पाटील यांनी आबांच्या परखडपणाची प्रशंसा केली. वसंतदादा पुढे म्हणाले, “सरळ वृत्तीने, सरळ स्वभावाने काम करणारे हे संपादक आहेत. खोटा अभिमान बाळगून त्यांनी कधी चुकीचे वर्तन केले नाही. अन्यायाविरुद्ध व जनतेच्या प्रश्नासाठी स्पष्टपणे आवाज उठविताना त्यांनी प्रसंगी मित्रालाही तोडायला मागेपुढे पाहिले नाही. अर्थात त्या त्या प्रश्नापुरते त्यांचे मित्र तुटतात. नंतर सारेजण त्यांच्याजवळ येतात. म्हणूनच त्यांना अजातशत्रू म्हटले जाते.”

आबांनी नम्रपणे सत्काराचा स्वीकार केला. त्याचवेळी त्यांनी कोल्हापुरातील पत्रकार भवनासाठी दीड लाख रुपयांची देणगी जाहीर केली. पत्रकार बांधवांना आवाहन करताना ते म्हणाले,

“पत्रकार भवन बांधा. पत्रकारांसाठी हक्काचं व्यासपीठ होऊ द्या. हेवेदावे विसरून गुण्यागोविंदानं काम करा. छत्तीसचा आकडा नको, त्रेसष्टचा असू द्या. आपण सर्वांनी मिळूनच लोकशाहीच्या चौथ्या खांबाचं रक्षण करायचंय, हे कधीही विसरू नका. आपल्यातच मतभेद असतील, तर लोकशाहीचा चौथा खांब खिळखिळा होईल. डगमगू लागेल. ‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे आचरण ठेवा. पत्रकारितेची प्रतिष्ठा जपा.”

असं बोलता बोलताच आबांनी व्यासपीठावरील नेत्यांनाही ‘लेकी बोले, सुने लागे’ या उक्तीप्रमाणे चार बोल सुनावले. ते म्हणाले,
“पत्रकारितेत काय नि राजकारणात काय, जिथं मतभेद जन्माला येतात, तिथं विकासाची गळचेपी होते, याची दखल निदान राज्यकर्त्यांनी तरी आवर्जून घेतली पाहिजे. जर हेतू एकच असेल, तर वेगळ्या वाटा कशासाठी?”
वडीलकीच्या नात्यानं नकळतपणे आबांनी यशवंतराव आणि वसंतरावदादांनाही कानपिचक्या दिल्या आणि सारे मतभेद विसरून

एकोप्यानं काम करावं, असं आवाहनही केलं. कारण चव्हाण आणि दादांच्यामध्ये तेव्हा टोकाचे मतभेद होते. दोघांमध्ये सख्य राहिलं नव्हतं. संबंध कमालीचे दुभंगलेले होते. त्यामुळे ते कधीच एका व्यासपीठावर येत नसत. आबा दोघांचेही निकटवर्ती. त्यामुळे आबांच्या अमृतमहोत्सवासाठी ते एका व्यासपीठावर आले होते. आबांचा वडीलकीचा अधिकार. त्या अधिकारानं आबांनी या दोन ज्येष्ठ नेत्यांना एकजुटीनं वागण्यास सांगितलं. उपस्थितांनी त्यांच्या या विधानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या सोहळ्याचं औचित्य साधून अनंतराव पाटील आणि रंगा वैद्य यांच्यासह महाराष्ट्रातील आजी-माजी संपादकांचेही सत्कार करण्यात आले. या भारदस्त सोहळ्यानं ‘पुढारी’कार ग. गो. जाधव यांच्या पत्रकारितेतील तपश्चर्येला जणू सर्वांनी मानाचा मुजराच केला.

अमृतमहोत्सवानंतर मान्यवरांच्या भेटी

आबांचा अमृतमहोत्सव सोहळा शानदारपणे आणि मोठ्या थाटात साजरा झाला; पण पुढेही कित्येक दिवस अभिनंदनासाठी लोकांची रीघ लागलेली होती. मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी आमच्या निवासस्थानी येऊन आबांचं अभीष्टचिंतन केलं. ‘सकाळ’च्या संचालिका बानू कोयाजी यांनीही 23 जून, 1982 रोजी आमच्या बंगल्यात भेट देऊन अमृतमहोत्सवानिमित्त आबांचं अभीष्टचिंतन केलं.

आबांना ‘पद्मश्री’ पुरस्कार

26 जानेवारी, 1984 रोजी आबांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा मानाचा पुरस्कार जाहीर केला. स्वातंत्र्य लढ्यापासून ते स्वातंत्र्योत्तर काळातही अर्धशतकाहून अधिक काळ आबांनी पत्रकारितेसह सामाजिक, शैक्षणिक आणि सहकाराच्या क्षेत्रातसुद्धा अतुलनीय कामगिरी बजावली होती. त्यांच्या या थोर योगदानाची दखल घेऊन केंद्र सरकारनं ‘पद्मश्री’द्वारा त्यांच्या कामाची पोचपावती दिली.

आबांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर होताच कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा न होईल तरच नवल! आबांच्या अभिनंदनासाठी लोकांची रीघ लागली. माझा आनंद तर गगनात मावेना. एखाद्याला असा पुरस्कार मिळाला असता, तर तो अक्षरशः हुरळून गेला असता; पण आबा पडले स्थितप्रज्ञ. त्यात त्यावेळी त्यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे पद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते दिल्लीला जायला तयार नव्हते.

माझं काम मी केलं

आबांची नसली, तरी त्यांनी दिल्लीला जाऊन राष्ट्रपतींच्या हस्ते या सन्मानाचा स्वीकार करावा, अशी माझी इच्छा होती. मात्र, आबांची त्यासाठी अजिबात तयारी नव्हती. तब्येतीचं कारण पुढे करीत ते मला म्हणाले,

“बाळ, माझी तब्येत ठीक नाही. मी काही तिकडे येणार नाही.” “तुम्हाला त्रास होऊ नये, यासाठी रेल्वेनं जाऊ. फार तर सोबत डॉक्टरही घेऊ.” मी त्यांना म्हणालो. पण आबा काही आपल्या निश्चयापासून ढळले नाहीत. ते मला म्हणाले, “मी माझं काम करीत राहिलो. तू पुरस्काराचं काय घेऊन बसलास!”
माझ्या लक्षात त्यांची स्थितप्रज्ञता आली. गौरव, सन्मान यापासून ते कोसो दूर गेले होते.

‘तुका म्हणे आता एकलेंचि भले
बैसोनि उगले राहावें ते ।’

त्यांची मनोवस्था आता अशीच झाली होती. आपण आपलं काम केलं; कारण ते आपलं कर्तव्यच होतं. त्यापुढे पुरस्कार नि सन्मान मोठे नाहीत, असंच त्यांना म्हणायचं होतं. त्यामुळे मग मीही त्यांना आग्रह केला नाही. अखेर केंद्र सरकारच्या वतीनं जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना घरी येऊन हा पुरस्कार प्रदान केला.

– आणि आमचे आबा ‘पद्मश्री ग. गो. जाधव’ झाले! आबांचं असं निरपेक्ष, निःस्वार्थी आणि विरक्त रूप पाहिलं, की आबा मला हिमालयाएवढे मोठे

वाटायचे आणि आपल्या पाठीशी या हिमालयाची सावली आहे, या कल्पनेनंच मला जगण्याचं नि काम करण्याचं बळ मिळायचं. म्हणूनच तैत्तिरीय उपनिषदातलं ते सुभाषित सदैव माझ्या ओठांवर रुंजी घालत असतं,
॥ पितृ देवो भवः॥

Back to top button