

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sana Malik : विधानसभेत आज (दि. १४) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवा पेनड्राईव्ह बॉम्ब सादर करत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. या पेन ड्राईव्हमध्ये एक ऑडिओ असल्याची त्यांनी माहिती सभागृहाला दिली. यातील डॉ. मुद्दस्सिर लांबे यांचे संबंध दाऊदशी असून डॉ. मुद्दस्सिर लांबे आणि अर्शद खान यांच्यातील संभाषणाचा हा ऑडिओ असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. लांबे यांना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमले. मात्र एका सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेने डॉ. लांबे त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली आहे, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेल्या आरोपांवर नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक (Sana Malik) यांनी ट्विटद्वारे उत्तर दिले आहे. सना मलिक यांनी डॉ. मुदस्सीर लांबे हे वक्फ बोर्डात कधी दाखल झाले याची तारीख समोर आणली आहे. याशिवाय त्यांनी मुदस्सीर लांबे यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो देखील ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये सना मलिक म्हणतात की, अर्धसत्य हे पूर्ण
खोटं असतं, डॉ तांबे यांची नियुक्ती ही फडणवीस यांच्या भाजप कालावधीत झाली आहे, महाविकास आघाडी सरकार हे २०१९ नोव्हेंबरमध्ये आलं होतं आणि नवाब मलिक यांच्याक वफ्फ बोर्ड आणि अल्पसंख्यांक विभाग हा जानेवारी २०२० ला आला. देवेंद्र फडणवीस हे डी गँगच्या नातेवाईकांच्या आणि बलात्काराचा आरोप असणाऱ्या व्यक्तीसोबत असल्याचा दावा सना मलिक केला.
फडणवीस यांनी आज दाऊदशी संबधित एक संवादाचा पेनड्राईव्ह विधानसभेत सादर केला आणि तो संवाद देखील उपस्थिती सर्वांना वाचून दाखवला. फडणवीस म्हणाले, या पेनड्राईव्हमधील संभाषणात दोन पात्रं आहेत. त्यापैकी एक आहे मोहम्मद अर्शद खान आणि दुसरे म्हणजे ज्यांना अल्पसंख्याक मंत्र्यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून घेतलं आहे ते डॉ. मुद्दसीर लांबे. ३१ डिसेंबर २०२० रोजी डॉ.लांबे यांच्याविरोधात एका सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती, असं त्यांनी सांगितले. (Sana Malik)