इटानगर : चिनी सैन्याकडून भारतीय तरुणाचे अपहरण

इटानगर : चिनी सैन्याकडून भारतीय तरुणाचे अपहरण

Published on

इटानगर : वृत्तसंस्था
भारतीय सीमारेषेवर चीनकडून आगळिकी सुरूच असतात. विशेषत: अरुणाचल प्रदेशात प्रत्यक्ष सीमारेषेवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून (पीएलए) सातत्याने घुसखोरीच्या घटना घडत असतात. त्या भारतीय जवानांनी वेळोवळी उधळूनही लावल्या आहेत. 'पीएलए'चा कहर म्हणजे अरुणाचलमधील एका 17 वर्षीय तरुणाचे अपहरण केले आहे. येथील खासदारानेच ही धक्‍कादायक माहिती दिली असून, त्याची तातडीने सुटका करण्याची मागणी केली आहे.

मिराम टेरॉन असे या अपहृत मुलाचे नाव आहे. तो अरुणाचलच्या सियांग जिल्ह्यातील जिदा या गावचा रहिवासी आहे. त्याच्या मित्राने चिनी सैन्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. मात्र, टेरॉन अद्याप चिनी सैन्याच्या ताब्यात आहे. त्याची सुटका करावी, अशी मागणी अरुणाचलचे खासदार तपीर गाओ यांनी केली. त्यानंतर भारतीय लष्कराने 'पीएलए'कडे टेरॉनला शोधण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. खासदार तपीर गाओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेरॉन आणि जॉनी यायिंग दोघे मित्र आहेत. त्सांगपो नदी ज्या ठिकाणी भारतात प्रवेश करते त्या ठिकाणी या दोघांचे अपहरण करण्यात आले. त्सांगपोला अरुणाचल प्रदेशमध्ये सियांग आणि आसाममध्ये ब्रह्मपुुत्रा असे म्हटले जाते. यातील यायिंगने चिनी सैनिकांकडून आपली सुटका करून घेतली. अपहरणाचा हा प्रकार त्याने स्थानिक अधिकार्‍यांना सांगितला. मी गृह राज्यमंत्री एन. प्रामाणिक यांच्या कानावर हा प्रकार घातला. तसेच देशाच्या संबंधित सर्व यंत्रणांना याची माहिती दिली. खासदार गाओ यांनी या प्रकाराची सर्व माहिती ट्विटरवर दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भारतीय लष्करालाही टॅग केले आहे. त्यानंतर भारतीय लष्कराने तातडीने हालचाली केल्या आणि अपहृत टेरॉनला शोधण्यासाठी मदत करण्याचे आवाहन 'पीएलए'ला केले आहे. अपहरणाच्या या प्रकारामुळे अरुणाचलमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर टीका

दरम्यान, तरुणाच्या अपहरणावरून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. चीनचा उद्दामपणा वाढत आहे. मात्र, भाजप सरकार त्यावर काहीही बोलायला तयार नाही. पंतप्रधानांचे मौन भ्याडपणाचे आहे. त्यांना अपहृत तरुणाची आणि त्यांच्या कुटुंबीयांची कसलीही काळजी नाही, अशी टीका करून आम्ही मिरामच्या कुटुंबीयांसोबत आहोत, असे ट्विट गांधी यांनी केले आहे.

याआधीही अपहरणाच्या घटना

'पीएलए'कडून तरुणांच्या अपहरणाच्या घटना याआधीही घडल्या आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये अरुणाचल प्रदेशच्या सुबनसिरी जिल्ह्यातील पाच युवकांचे अपहरण करण्यात आले होते. जवळपास एका आठवड्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news