

Zero Civic Sense Trend: सध्या सोशल मीडियावर एका इन्फ्लुएन्सर्सचा व्हिडिओ चर्चेत आहे. इन्फ्लुएन्सर अमुल्या रतन हिची एक स्नॅपचॅट क्लिप व्हायरल झाली असून, शूट सुरू असताना मागून एक व्यक्ती चालत गेली म्हणून ती चिडल्याचं या व्हिडिओत दिसतं. मात्र या प्रकारानंतर लोकांनी त्या व्यक्तीऐवजी अमुल्यावरच टीका करत तिला ट्रोल केलं आहे.
अमुल्याचे सोशल मीडियावर सुमारे 46 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. व्हिडिओमध्ये ती रेकॉर्डिंग करत असताना एक व्यक्ती तिच्या मागून फ्रेममध्ये चालत जाते. इतक्यात अमुल्या शूट थांबवून त्या व्यक्तीकडे पाहून नाराजी व्यक्त करते. ती या प्रकाराला 'नो सिव्हिक सेन्स' असं म्हणत टीका करते. त्यामुळे सध्या 'नो सिव्हिक सेन्स' हा सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
या क्लिपमध्ये अमुल्या असंही म्हणते की, तिला सर्वात जास्त वाईट याचं वाटलं की त्या व्यक्तीने सॉरीसुद्धा म्हटलं नाही. यावरुन तिला राग आल्याचं दिसत आहे. पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी उलट प्रश्न विचारायला सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणी चालत असताना माफी का मागायची?
सोशल मीडियावर अनेकांनी लिहिलं की, हा प्रकार सार्वजनिक ठिकाणी घडला आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणीही मोकळेपणाने चालू शकतं आणि कोणीतरी शूट करत आहे म्हणून प्रत्येकाने थांबावं किंवा बाजूला व्हावं अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे.
अनेक यूजर्सनी असंही सांगितलं की, त्या व्यक्तीने अमुल्याशी कसलाही संवाद साधलेला नाही, ती शूट करतेय हे कदाचित त्याच्या लक्षातही आलं नसेल. अशा परिस्थितीत सॉरीची अपेक्षा करणं चुकीचं आहे.
या प्रकरणात 'सिव्हिक सेन्स' हा शब्द वापरल्यामुळेही टीका झाली आहे. अनेकांच्या मते सार्वजनिक ठिकाणी चालत जाणं हे काही गैर नाही. त्यामुळे हा प्रकार 'सिव्हिक सेन्स'शी जोडणं अतिशयोक्ती असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे
आज सोशल मीडिया कंटेंट तयार करताना अनेकदा सार्वजनिक जागेचा पर्सनल सेट म्हणून वापर केला जातो, अशी लोकांची तक्रार आहे. काहींच्या मते कंटेंट तयार करणं हा त्या व्यक्तीचा अधिकार असला, तरी सार्वजनिक ठिकाणी शूट करताना लोक येणारच, गोंधळ होणारच, या गोष्ट स्वीकाराव्या लागतील. त्यामुळे जबाबदारी लोकांची नाही, तर शूट करणाऱ्या व्यक्तीची आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.