

Zepto Delivery Agent Viral Video: झेप्टो डिलिव्हरी बॉय आणि ग्राहक यांच्यात झालेल्या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की एका डिलिव्हरी बॉयच्या सहकाऱ्याला ग्राहकाकडून शिवीगाळ आणि मारहाण झाली होती. हा प्रकार समजताच झेप्टो रायडर्सचा एक ग्रुप एकत्र आला आणि थेट त्या ग्राहकाच्या बंगल्याकडे निघाला. डिलिव्हरी बॉयने हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात शुट केला आहे.
व्हिडिओमध्ये डिलिव्हरी बॉय सांगतो की त्याच्या सहकाऱ्याशी डिलिव्हरी दरम्यान गैरवर्तन झाले. त्यानंतर सर्व रायडर्स एकत्र येऊन संबंधित ग्राहकाच्या घरी गेले. तेथे पोहोचल्यानंतर रायडर्सनी एका व्यक्तीला प्रश्न विचारत उत्तर मागितले. रायडर्सचा आरोप होता की पार्सलसंबंधी वादातून त्या व्यक्तीने डिलिव्हरी बॉयला शिवीगाळ केली आणि त्याच्यावर हात उगारला.
समोरच्या व्यक्तीने मात्र सर्व आरोप नाकारले आणि संपूर्ण घटना "गैरसमज" झाल्यामुळे घडली आहे असे म्हटले. त्याने सांगितले की, डिलिव्हरी बॉयने पत्ता स्पष्ट दिसत असतानाही "कळत नाही" असे सांगितले, त्यामुळेच चिडचिड झाली. रायडर्सनी त्याच्याकडून पुरावे मागितले, पण दुकानातील कर्मचाऱ्यांनी स्वतःची बाजू मांडत रायडर्सना तिथून निघण्यास सांगितले.
डिलिव्हरी बॉय म्हणतो, “हा माझा सहकारी आहे. डिलिव्हरी करताना दुकान मालकाने याच्यावर हल्ला केला. आता आम्ही त्याच्या बंगल्यावर पोहोचतो, तिथे काय होतं ते पाहू.” यानंतरची फ्रेम बंगल्याच्या दाराशी शूट केलेली असून, एक व्यक्ती दरवाजा उघडून स्वतःची बाजू सांगत आहे. परंतु तो म्हणतो की मी कॅमेऱ्या समोर बोलणार नाही. त्यावर रायडर म्हणतो, “मी व्हिडिओ पुराव्यासाठी काढतोय, यात चुकीचं काय आहे?”
बंगल्याच्या मालकाने आरोप केला की डिलिव्हरी बॉय बाहेर सतत हॉर्न वाजवत होता, ज्यामुळे ग्राहकांना त्रास झाला. रायडरने हा आरोपही फेटाळला. हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण रायडर्सच्या समर्थनात आहेत तर काहीजणांना ग्राहकाची बाजू योग्य वाटते.