Maharashtra FDA Zepto License Suspended
मुंबई: धारावीतील गोदामात अत्यंत गलिच्छ अवस्थेत अन्नपदार्थ ठेवलेले आढळल्याने आणि त्यासाठी ठेवलेल्या रेफ्रिजरेटर्सचे तापमानही यथातथाच असल्याने खराब झालेले पदार्थ ग्राहकांना दिले जात असल्याचे निदर्शनास येताच झेप्टोचा म्हणजेच किरणाकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा अन्न परवाना अन्न औषध प्रशासनाच्या मुंबई विभागाने रद्द केला आहे.
झेप्टो जोपर्यंत त्यांच्या गोदामातील सर्व त्रुटी दुरुस्त करत नाही तोपर्यंत झेप्टोला मुंबईकरांची अन्न पदार्थांसाठीची ऑर्डर घेता येणार नाही. मुंबईकरांनीही झेप्टोला अशा ऑर्डर्स देऊ नयेत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
धारावीतील गोदामात छापे टाकले असता अनेक अन्नपदार्थांवर बुरशी आढळली. साचलेल्या पाण्याजवळ अन्नसामग्री साठवलेली होती. स्वच्छतेचा अभाव होता. कोल्ड स्टोरेजमध्ये आवश्यक तापमान राखले जात नव्हते. मजले भिजलेले व अस्वच्छ होते. अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवलेले होते आणि मुदत संपलेला व न संपलेला साठा वेगळा न ठेवता एकत्रच साठवलेला होता.
हे सर्व प्रकार परवाना अटींचे गंभीर उल्लंघन करणारे असून मुंबईकरांच्या आयुष्याशी आणि आरोग्याशी खेळ करणारे असल्याने झेप्टोचा अन्न परवाना तडकाफडकी निलंबित करण्याचा निर्णय अन्न औषध प्रशासनाने घेतला. त्रुटींची पूर्तता झाली आहे, याची खात्री झाल्यानंतरच हा परवाना झेप्टोला पूर्ववत दिला जाईल.