

कवरत्ती : वृत्तसंस्था
समुद्राने वेढलेल्या बेटांपुढे पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि ऊर्जेचा तुटवडा ही मोठी समस्या असते. या पार्श्वभूमीवर लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती येथे समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी तयार करणारा आणि वीज निर्मिती करणारा अत्याधुनिक प्रकल्प उभारला जात आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो जगातील पहिला ओटीईसी (ओशन थर्मल एनर्जी कनव्हर्जन) आधारित हायब्रिड प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पातून दररोज मोठ्या प्रमाणात शुद्ध पाणी आणि २४ तास वीज उपलब्ध होणार आहे.
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री जितेंद्र सिंग यांनी या प्रकल्पाला भविष्यातील ऊर्जा सुरक्षिततेचा पाया असे म्हटले आहे. हा प्रकल्प नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीने (एनआयओटी) भूशास्त्र मंत्रालयांतर्गत सुरू केला आहे. या तंत्रज्ञानात समुद्राच्या पृष्ठभागावरील गरम पाणी आणि खोल समुद्रातील थंड पाणी यांचा वापर करून वीज आणि पिण्याचे पाणी तयार केले जाते. या प्रक्रियेत गरम पाणी व्हॅक्युममध्ये नेऊन वाफ तयार केली जाते.
ही वाफ टर्बाईन फिरवून वीज निर्माण करते. त्यानंतर खोल समुद्रातून आणलेल्या थंड पाण्याने ही वाफ थंड केली जाते आणि त्यातून शुद्ध पिण्याचे पाणी तयार होते. १,००० मीटर खोल समुद्रातून थंड पाणी या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे समुद्राच्या तळापासून थंड पाणी वर आणणे.
यासाठी वैज्ञानिकांची टीम सुमारे ३.८ किलोमीटर लांबीची पाईपलाईन बसवत आहे. ९०० मि.मी. व्यासाची हायडेंसिटी पॉलिथिलीन पाईपलाईन समुद्राच्या तळाशी जाऊन सुमारे १,००० मीटर खोलीतील बर्फासारखे थंड पाणी वर आणेल. कवरत्तीच्या लगून परिसरात या पाईपलाईनचे वेल्डिंग आणि बसविण्याचे काम सुरू आहे.
बेटाच्या गरजेपेक्षा जास्त वीज उत्पादन
सध्या लक्षद्वीपमध्ये वीजनिर्मितीसाठी डिझेल जनरेटरचा वापर केला जातो. मुख्य भूमीवरून जहाजांद्वारे डिझेल आणणे खर्चिक आणि पर्यावरणासाठी धोकादायक ठरते. नवीन प्रकल्पातून सुमारे ६५ मेगावॅट वीज निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण लक्षद्वीपची रोजची वीज गरज केवळ १० ते १२ मेगावॅट इतकी आहे. त्यामुळे हा प्रकल्प बेटांच्या गरजा पूर्ण करून इतर बेटांनाही स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देऊ शकतो.
दररोज १ लाख लिटर पिण्याचे पाणी
नवीन प्रकल्पातून दररोज सुमारे १ लाख लिटर शुद्ध पाणी तयार होणार आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्प चालवण्यासाठी डिझेल किंवा बाहेरील विजेची गरज भासणार नाही. सध्या लक्षद्वीपमधील आठ बेटांवर लो टेम्परेचर थर्मल डिसॅलिनेशन तंत्रज्ञानाद्वारे समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी तयार केले जाते; मात्र हे प्रकल्प चालवण्यासाठी डिझेल जनरेटरवर अवलंबून राहावे लागते.