

Women Health
नवी दिल्ली : पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक काळ जगत असल्या तरी त्यांना आयुष्यातील अधिक वर्षे पाठदुखी, नैराश्य, चिंता आणि इतर दीर्घकालीन आजारांशी झुंज देत घालवावा लागत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. द लॅन्सेट पब्लिक हेल्थ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाने महिलांच्या आरोग्याविषयीचे एक गंभीर वास्तव समोर आले आहे.
२०४ देश आणि प्रदेशांतील आकडेवारीच्या आधारे करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार, महिलांमध्ये जीवनमानावर परिणाम करणाऱ्या अनेक दीर्घकालीन आणि प्राणघातक नसलेल्या आजारांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक आहे. दुसरीकडे पुरुषांना जीवघेण्या आजारांमुळे आणि दुखापतींमुळे अकाली मृत्यू येण्याची शक्यता जास्त असते.
संशोधकांच्या मते, जगभरातील महिलांना सर्वाधिक त्रास देणारी समस्या म्हणजे कंबरदुखी. याशिवाय नैराश्य, चिंताविकार, डोकेदुखी, स्नायू व हाडांशी संबंधित विकार तसेच स्मृतिभ्रंश यांचा महिलांवर अधिक परिणाम होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या निष्कर्षांमुळे "जास्त आयुष्य म्हणजे चांगले आरोग्य" ही सर्वसाधारण समजूत आव्हानासमोर उभी राहिली आहे. साकेत येथील मॅक्स हॉस्पिटल, साकेत येथील इंटर्नल मेडिसिन विभागाचे संचालक डॉ. रोमेल टिकू यांनी सांगितले की, केवळ दीर्घायुष्य हे उत्तम आरोग्याचे मापदंड ठरू शकत नाही. "महिला अधिक काळ जगत असल्या तरी त्यांना आयुष्याचा मोठा कालावधी दीर्घकालीन वेदना, मानसिक आरोग्याच्या समस्या आणि अपंगत्व आणणाऱ्या आजारांशी सामना करण्यात खर्च करावा लागतो," असे त्यांनी स्पष्ट केले.
अभ्यासानुसार, महिला आणि पुरुषांमधील आरोग्यविषयक तफावत लहान वयापासूनच दिसून येते आणि वयानुसार ती अधिक वाढत जाते. किशोरवयातच मुलींमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या आणि स्नायू-हाडांच्या विकारांचे प्रमाण वाढू लागते, जे पुढे प्रौढावस्थेतही कायम राहते. डॉ. टिकू यांच्या मते, यामागे जैविक आणि हार्मोनल घटक, स्वयंप्रतिकार विकारांची अधिक शक्यता, स्नायू-हाडांचे आजार तसेच कुटुंबीयांची काळजी घेण्याच्या सामाजिक जबाबदाऱ्या यांसारखी अनेक कारणे असू शकतात. या सर्वांचा महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
संशोधकांनी असेही नमूद केले की, अनेक देशांतील आरोग्य व्यवस्था अजूनही प्रामुख्याने प्रजनन आणि मातृत्व आरोग्यावर केंद्रित आहेत. त्यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या दीर्घकालीन आजारांकडे तुलनेने दुर्लक्ष होत आहे. याउलट, पुरुषांमध्ये कोविड-१९, हृदयविकार, रस्ते अपघात आणि दीर्घकालीन श्वसनविकारांचे प्रमाण अधिक आढळले. त्यामुळे पुरुषांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तुलनेने जास्त असल्याचेही या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.