

women dating app tea hack
दिल्ली : पुरुषांसोबतच्या डेटिंगबद्दल माहिती शेअर करणाऱ्या 'टी' (Tea) या प्रसिद्ध ॲपवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. कंपनीने स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला असून, या डेटा ब्रीचमुळे हजारो महिला युझर्सचे फोटो ऑनलाइन लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये व्हेरिफिकेशनसाठी वापरलेले सेल्फी आणि खासगी चॅटमधील फोटोंचाही समावेश आहे.
या घटनेमुळे ॲपच्या सुरक्षेवर आणि युझर्सच्या गोपनीयतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'टी' ॲपच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ७२,००० फोटो परवानगीशिवाय ॲक्सेस करण्यात आले आहेत. यामध्ये १३,००० फोटो अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी युझर्सनी अपलोड केलेले सेल्फी किंवा ओळखपत्रासोबतचे (ID) सेल्फी आहेत, जे अत्यंत खासगी आहेत. तर, ॲपमधील ५९,००० इतर फोटो सार्वजनिक पोस्ट, कमेंट्स आणि चॅटमधील फोटोंचा यात समावेश आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की युझर्सचे ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर सुरक्षित आहेत आणि हा डेटा लीक झालेला नाही. हा सायबर हल्ला केवळ फेब्रुवारी २०२४ पूर्वी ॲपवर नोंदणी केलेल्या युझर्सना प्रभावित करतो.
'टी' हे फक्त महिलांसाठी तयार केलेले एक खास डेटिंग ॲडव्हाइस प्लॅटफॉर्म आहे. टिंडर (Tinder) किंवा बंबल (Bumble) सारख्या ॲप्सवर भेटलेल्या पुरुषांबद्दल महिला इथे माहिती आणि अनुभव शेअर करतात. या ॲपचा मुख्य उद्देश महिलांना सुरक्षित डेटिंगचा अनुभव देणे हा आहे. समोरची व्यक्ती खरी आहे की नाही, तिचे आधीच लग्न झाले आहे का, किंवा तिचा काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का, हे तपासण्यासाठी ॲपमध्ये AI रिव्हर्स इमेज सर्च, लपवलेले विवाह संबंध तपासण्यासाठी फोन नंबर लुकअप, गुन्हेगारी रेकॉर्ड तपासण्यासाठी बॅकग्राउंड चेक, या सुविधा आहेत. एकीकडे महिलांना डेटिंगमध्ये सुरक्षित वाटावे आणि फसवणुकीपासून त्यांचा बचाव व्हावा यासाठी तयार करण्यात आलेल्या या ॲपच्या सुरक्षेवरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डेटा लीक झाल्यानंतर कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. "आम्ही या घटनेच्या तपासासाठी थर्ड-पार्टी सायबर सुरक्षा तज्ञांची मदत घेतली असून, आमची टीम सिस्टीम सुरक्षित करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे," असे कंपनीने म्हटले आहे. "युझर्सच्या डेटाचे आणि गोपनीयतेचे संरक्षण करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे," असे कंपनीने म्हटले आहे.