

दिल्ली : ‘सैयारा’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री अनीत पड्डा सध्या खूप चर्चेत आहे. तिच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच, तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहून चहाप्रेमींनाही आश्चर्य वाटेल.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अनीत एका टपरीवर चहाचा आस्वाद घेताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला ती म्हणते, "मी कधीच चहा प्यायलेला नाही." यानंतर ती चहाचा एक घोट घेते आणि म्हणते, "मी पहिल्यांदाच चहा पीत आहे. मी माझी 'चाय व्हर्जिनिटी गमावली आहे." चहा प्यायल्यानंतर तिला खूप मजा आल्याचेही ती सांगते. तेवढ्यात अनितला एक कुत्रा दिसतो आणि ती त्याला बिस्किट खाऊ घालते. कुत्रा ढेकर देतो का, असा प्रश्नही ती आश्चर्याने विचारते. तिचा हा प्रेमळ स्वभाव पाहून चाहते तिच्यावर आणखीनच फिदा झाले आहेत.
व्हिडिओच्या कमेंटमध्ये चाहते अनितला 'क्यूट' म्हणत आहेत. काही जण तिच्या सौंदर्याचं, तर काही जण तिच्या आवाजाचं कौतुक करत आहेत. एका युझरने लिहिले आहे, "कॅरेक्टरमध्ये इतकी शिरली आहे की विसरण्याचं नाटक करता करता खरंच विसरू लागली आहे. भारतात राहून चहा प्यायला नाही, हे शक्यच नाही." तर दुसऱ्या एका युझरने कमेंट केली आहे, "ही तीच मुलगी आहे जिने सर्वांना रडवलं होतं."
मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ हा एक लव्ह स्टोरी चित्रपट आहे, जो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटातून अनीत पड्डा आणि अहान पांडे यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटानंतर 'नॅशनल क्रश'चा ताज तृप्ती डिमरीकडून आता अनीतच्या डोक्यावर आला आहे, असं म्हटलं जात आहे.