

Indore Woman Crime: रक्षाबंधनाच्या दिवशी भावाबद्दल टोमणा मारल्याने झालेल्या वादातून एका महिलेने आपल्या भावजईची चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना इंदूरमधील राऊ भागात घडली. वंदना (21) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी पार्वतीबाई कुशवाह हिला अटक केली आहे. हत्येसाठी वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे.
राऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू नेहरू नगर येथे एका बंद घराबाहेरील पाण्याच्या टाकीत वंदनाचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती पाहता हा खून असल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यांनी तपास सुरू केला.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामध्ये पार्वती संशयास्पद पद्धतीने घरातून बाहेर जाताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला असता ती अरविंदो रुग्णालयात गेल्याचे समोर आले. तिचा पती रुग्णालयात दाखल असल्याने ती त्याला भेटण्यासाठी तिथे गेली होती. पोलिसांनी पार्वतीला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान तिने वंदनासोबत झालेल्या भांडणाची माहिती दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी तुरुंगात असलेल्या भावाला राखी बांधता आली नाही म्हणून वंदनाने पार्वतीच्या भावाबद्दल टोमणा मारला होता. यावरून दोघींमध्ये वाद झाला. हा वाद वाढत गेल्यानंतर पार्वतीने वंदनावर चाकूने हल्ला केला. पार्वतीने वंदनाच्या मानेवर दोन वेळा चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वंदनाचा मृत्यू झाला.
वंदनाचा मृत्यू झाल्यानंतर पार्वतीने तिचा मृतदेह घराबाहेर ओढत नेला. त्यानंतर मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून खून लपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पार्वतीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगितले. तिच्या सांगण्यावरून हत्येत वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, वंदनाने 11 ऑगस्ट रोजी उपेंद्रसोबत प्रेमविवाह केला होता. या लग्नाला कुटुंबातील काही सदस्यांचा विरोध असल्याचे सांगण्यात आले आहे. वंदनाच्या वागण्यावरुन कुटुंबात नाराजी होती.
लग्नानंतर उपेंद्रने न्यू नेहरू नगरमधील घर सोडून राज नगरमध्ये भाड्याच्या घरात राहण्यास सुरुवात केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
वंदना बेपत्ता झाल्यानंतर तिच्याबाबत चंदन नगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार करण्यात आली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, खुनाच्या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी वंदना आणि पार्वती घरात एकट्याच होत्या. पार्वतीची मुले शाळेत गेली होती, तर तिचा पती आणि दीर रुग्णालयात होते.
सीसीटीव्हीमधील चित्रण आणि पोलिसांनी केलेल्या तातडीच्या तपासामुळे काही तासांत या प्रकरणाचा उलगडा झाला. उपपोलीस आयुक्त नरेंद्र सिंह रावत यांनी सीसीटीव्हीमुळे आरोपीपर्यंत पोहोचता आल्याचे सांगितले.
पोलिसांनी पार्वतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. वंदनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.