Madhya Pradesh Crime News |
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १८ महिन्यांपूर्वी ज्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले तीच मुलगी जिवंत आणि सुरक्षित परतली आहे. तिच्यावर बलात्कार आणि हत्या करण्यात आल्याच्या आरोपाखाली ४ जणांना अटक करण्यात आली होती. परंतु १८ महिन्यांनंतर ती मुलगी सुखरूप परतली, ज्यामुळे पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला. तिच्या परतल्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.
ही घटना झाबुआ जिल्ह्यातील आहे. ९ सप्टेंबर २०२३ रोजी झाबुआ येथे एका महिलेचा मृतदेह सापडला. आदिवासी समुदायाच्या एका कुटुंबातील सदस्यांनी तो मृतदेह त्यांच्या २८ वर्षीय मुलीचा असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी ती बेपत्ता झाली होती, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबाकडे मृतदेह सोपवला आणि बलात्कार करून हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला. कुटुंबियांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. दरम्यानच्या काळात त्या मुलीच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली. आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि खटला अशा टप्प्यावर पोहोचला जिथे फक्त एका साक्षीदाराची चौकशी करायची होती. १८ महिन्यांनी ११ मार्च २०२५ रोजी, ही महिला तिच्या कुटुंबासह स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली. ती जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी तिने तिचे आधार आणि मतदान कार्ड देखील आणले होते.
मुलीने सांगितले की, ती ऑगस्ट २०२३ मध्ये कोणालाही न सांगता घर सोडून गेली. एक वर्षापेक्षा जास्त काळ राजस्थानच्या कोटा येथे तिला बंदी ठेवण्यात आले होते. "एका मुलासाठी कोणालाही न सांगता घरातून निघून गेले. त्याने सांगितलं की तो माझ्यावर प्रेम करतो आणि माझ्याशी लग्न करायचं आहे. म्हणून मी कोणालाही न सांगता घर सोडले आणि भापुरा येथील त्या मुलासोबत राहायला गेले. पण, अवघ्या दोन दिवसांनंतर त्याने मला दुसऱ्या व्यक्तीला ५ लाख रुपयांना विकले. तो व्यक्ती मला कोटा येथे घेऊन गेला आणि मला बंदी ठेवले. मला माझ्या कुटुंबाशी संपर्क करण्याची परवानगी नव्हती. मी अनेक वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण जाऊ शकले नाही. एक दिवस मला संधी मिळाली आणि मी पळून गेलो." तिने सांगितले की तिला माहीत नव्हते की तिला मृत घोषित करण्यात आले आहे आणि तिच्या कुटुंबाने दुसऱ्या महिलेला ती असल्याचे समजून अंत्यसंस्कार केले आहेत. परत आल्यानंतरच मला हे कळले, असे ती म्हणाली.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या खुलाशानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने मे महिन्यात या प्रकरणात अटक केलेल्यांपैकी एकाला जामीन मंजूर केला. झाबुआचे पोलिस अधीक्षक पदम विलोचन शुक्ला यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू केला असून सर्व पुरावे तपासले जात आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रेम लाल कुर्वे यांनी सांगितले की, प्राथमिक तपास कुटुंबाने त्यांना सांगितलेल्या माहितीवरून सुरू आहे. त्यावेळी, आम्हाला एक अज्ञात मृतदेह सापडला होता. व्हॉट्सअॅपवर त्याचे फोटो आम्ही शेअर केले होते. त्यावर त्या कुटुंबाने त्यांच्या मुलीचा मृतदेह असल्याचे सांगितले. त्या आधारे आम्ही गुन्हा दाखल केला. आता ती परत आली आहे, आम्ही पुन्हा पुरावे तपासत आहोत."
फॉरेन्सिक तपासणीचा एक नवीन टप्पा सुरू आहे. ती एका व्यक्तीसोबत पळून गेली होती. त्यावेळी मृतदेहाचा डीएनए कुटुंबाच्या डीएनएशी जुळत नव्हता. आम्ही सर्व फॉरेन्सिक पुरावे पुन्हा तपासत आहोत, असे कुर्वे यांनी सांगितलं.