Crime News
अमरोहा: पतीने चिकन आणले, मात्र पत्नीने ते न बनवता शाकाहारी जेवण बनवले. यावरून दोघांत वाद झाला. वादाच्या दरम्यान पतीने पत्नीला मारहाण केली. अखेर संतापलेल्या पत्नीने टोकाचे पाऊल उचललं आणि १० महिन्यांचा संसार क्षणात उद्ध्वस्त झाला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती निगम याला अटक केली असून, त्याच्यासह कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News)
अमरोहा येथील निगम (वय २२) याचा विवाह १० महिन्यांपूर्वी रीना (वय २१) सोबत झाला होता. २१ ऑगस्ट रोजी रात्री निगम चिकन आणि दारू घेऊन घरी आला. त्याने रीनाला चिकन बनवण्यास सांगितले, मात्र तिने त्याला नकार दिला. रीनाने चिकन न बनवता शाकाहारी जेवण बनवले, ज्यामुळे निगम संतापला. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात निगमने रीनाला मारहाण केली, त्यानंतर रीनाने गळफास लावून जीवन संपवल्याचे पोलिसांनी सांगितले.
रीनाच्या मृत्यूनंतर निगम घाबरला. त्याने तिच्या कुटुंबीयांच्या भीतीने रीनाचा मृतदेह एका चादरीत गुंडाळला. त्यात माती भरून नातेवाईकांच्या मदतीने तो गंगेत फेकून दिला. त्यानंतर त्याने पत्नी हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. मात्र, पोलिसांच्या चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला.
रीनाच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, लग्नानंतर रीनाचा हुंड्यासाठी छळ केला जात होता. यावरूनच तिचा खून करण्यात आला. पोलिसांनी रीनाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पती निगमसह त्याच्या आई-वडिलांवर आणि इतर नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, निगमचे आई-वडील अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (Crime News)