Crime News
लखनौ: प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरच्यांनीच जावयाचा खून केल्याची केल्याची धक्कादायक घटना लखनौमध्ये घडली आहे. दोन दिवसांपूर्वी निगोहान पोलिस स्टेशन हद्दीतील सिसेन्डी रोडवर एका नाल्यात शनि रावत (वय २४) या तरूणाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी दोन संशयित आरोपींना अटक केली असून, तिघेजण अद्याप फरार आहेत.
सुमारे दीड वर्षांपूर्वी शनि रावतने अटक करण्यात आलेला संशयित आरोपी देवेश यादवच्या बहिणीशी तिच्या कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता लग्न केले होते. त्यांच्या या प्रेमविवाहामुळे कुटुंबामध्ये नाराजी होती. पण जेव्हा या दाम्पत्याला अपत्य झाले, तेव्हा परिस्थिती भडकली. आपल्या कुटुंबाचा अपमान झाल्याचा राग मनात धरून देवेश यादव, त्याचा भाऊ जितू आणि इतर साथीदारांनी शनिच्या हत्येचा कट रचला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर रोजी संतोष यादव (३५) याने शनि रावतला जेल रोडवरील एका दारूच्या दुकानाजवळ बोलावले. तिथे आधीच एक एसयूव्ही गाडी उभी होती. शनि गाडीत बसल्यावर देवेश, जितू आणि त्यांच्या साथीदारांनी लोखंडी रॉडने त्याच्यावर हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला सिसेन्डी रोडवर असलेल्या नाल्याकडे ओढत नेण्यात आले आणि तिथे पुन्हा त्याच्या डोक्यावर रॉडने वार करून त्याची हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्याचा मृतदेह नाल्याच्या पाण्यात फेकून दिला.
या घटनेनंतर, पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला लोखंडी रॉड, रक्ताने माखलेला टॉवेल आणि गुन्ह्यासाठी वापरलेली एसयूव्ही गाडी जप्त केली. पोलिसांनी मुख्य आरोपी संतोष यादव आणि देवेश यादव यांना अटक केली आहे. देवेशचा भाऊ जितू, राजकुमार आणि जय सिंग उर्फ कल्लू अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अतिरिक्त डीसीपी वसंत रल्लापल्ली यांनी सांगितले की, "हे प्रकरण कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा मानून घडवून आणले गेले आहे." आरोपी संतोष आणि देवेश दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, संतोषवर यापूर्वीही खुनाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती एसीपी मोहनलालगंज रजनीश वर्मा यांनी दिली.