

India's reply on US tariff
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) आणि एक ‘दंड’ (पेनल्टी) लावण्याची घोषणा केल्यानंतर भारत सरकारने यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बुधवारी रात्री एक अधिकृत निवेदन जारी करून सांगितले की, सरकार या निर्णयाचे परिणाम अभ्यासत आहे आणि “राष्ट्रीय हित जोपासण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलणार आहे”.
सरकारने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याची आम्ही नोंद घेतली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून एक परस्पर संतुलित आणि फायदेशीर व्यापार करार होण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. भारत त्या उद्दिष्टावर ठाम आहे.”
सरकारने यावेळी सूचकपणे युनायटेड किंगडमसोबत नुकत्याच झालेल्या Comprehensive Economic and Trade Agreement (CETA) चा उल्लेख केला आणि सांगितले की, भारत नेहमीच आपल्या शेतकऱ्यांचे, उद्योजकांचे आणि लघु-मध्यम उद्योगांचे हित जपतो.
ट्रुथ सोशल (Truth Social) या ट्रम्प यांच्या सोशल मीडियावर ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याबरोबरच, रशियाकडून मोठ्या प्रमाणात खनिज तेल खरेदी केल्यामुळे एक ‘दंड’ देखील आकारला जाणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी दंडाच्या अचूक रकमेबाबत काहीही स्पष्ट केले नाही.
ट्रम्प यांनी त्यांच्या नेहमीच्या रोखठोक शैलीत लिहिले, “भारत आमचा मित्र आहे, पण त्यांनी नेहमीच अमेरिकेशी कमी व्यापार केला आहे. कारण भारताचे टॅरिफ खूप जास्त आहेत आणि त्यांच्या व्यापार अटी अत्यंत त्रासदायक आहेत. शिवाय, त्यांनी लष्करी उपकरणे आणि ऊर्जा क्षेत्रात रशियाकडे झुकत राहिले आहे.”
दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यापूर्वीही स्पष्टपणे सांगितले होते की, भारत आपल्या नागरिकांच्या हितासाठी कोणत्याही देशाकडून स्वस्त आणि आवश्यक तेल खरेदी करेल.
लंडनमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी देखील नुकत्याच एका कार्यक्रमात उत्तर देताना सांगितले होते की, “भारत ऊर्जा खरेदी करत नाही कारण त्याला आवडते, तर कारण त्याला पर्याय उरलेले नाहीत. आम्ही 80 टक्क्यांपेक्षा जास्त ऊर्जा आयात करतो.
बाजारात आम्हाला आधी ज्या देशांकडून ऊर्जा मिळायची ती आता पाश्चिमात्य देशांनी विकत घेतली आहे. मग आम्ही काय करू? आपली अर्थव्यवस्था बंद करावी का?”