

US 25% Tariff on India Donald Trump announcement
पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधत, भारतीय वस्तूंवर 25 टक्के आयात शुल्क आणि अतिरिक्त दंड लावण्याची घोषणा केली आहे.
हे नवीन शुल्क 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार असून, ट्रम्प यांनी यामागची दोन प्रमुख कारणं दिली आहेत – रशियाकडून तेल आणि संरक्षण सामग्री खरेदी आणि भारताचे कठीण व त्रासदायक व्यापार अटी.
Truth Social या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ट्रम्प यांनी लिहिले आहे की, “भारत हा आपला मित्र आहे, परंतु अनेक वर्षांपासून आपण भारतासोबत फारसा व्यापार करू शकलो नाही, कारण त्यांचे आयात शुल्क खूपच जास्त आहे– जगातल्या सर्वाधिक दरांपैकी एक – आणि त्यांचे गैर-आर्थिक (non-monetary) व्यापार अडथळे अत्यंत कठीण व त्रासदायक आहेत.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये भारताच्या रशियाशी असलेल्या नातेसंबंधांवर विशेषतः लक्ष केंद्रीत केले.
त्यांनी लिहिले- “भारत नेहमीच रशियाकडून मोठ्या प्रमाणावर लष्करी उपकरणं खरेदी करत आला आहे आणि चीनसह तो रशियाचा सर्वात मोठा ऊर्जा खरेदीदार आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग रशियावर दबाव टाकण्याच्या प्रयत्नात असताना भारताचा हा पवित्रा अत्यंत निराशाजनक आहे.”
गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर चर्चा सुरू होती. परंतु अद्याप कोणतीही ठोस सहमती न झाल्याने ट्रम्प यांनी थेट आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्यांनी पुढील विधान केले:
“भारतासोबत आमच्याकडे मोठा व्यापार तूट आहे. त्यांनी त्यांच्या बाजारात अमेरिकन कंपन्यांना प्रवेश देण्याचे दरवाजे बंद ठेवले आहेत. 1 ऑगस्ट हा अमेरिकेसाठी महान दिवस ठरेल.”
या निर्णयामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः टेक्सटाइल्स, औषधं, ऑटो पार्ट्स, स्टील आणि कृषी उत्पादने या क्षेत्रांमध्ये अमेरिका हा एक मोठा बाजार आहे. त्यामुळे सरकारला आता नव्याने अमेरिकेशी चर्चेची दिशा ठरवावी लागणार आहे.
एप्रिलमधील 26 टक्के शुल्क मागे घेतले होते
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी 2 एप्रिल 2025 रोजी भारतीय वस्तूंवर 26 टक्के टॅरिफ लावले होते, परंतु लवकरच ते शुल्क तात्पुरते मागे घेण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा अधिक कठोर भूमिका घेत त्यांनी 25 टक्के टॅरिफ आणि अतिरिक्त दंड लागू करण्याची घोषणा केली आहे.
भारत सरकारकडून या घोषणेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालय किंवा वाणिज्य मंत्रालयाकडून लवकरच स्पष्ट भूमिका घेतली जाईल, अशी शक्यता आहे.