

International Kabaddi player Sheelu Balhara wife dies
रोहतक: आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू शीलू बल्हारा याच्या पत्नीने शुक्रवारी दुपारी हरियाणामधील रोहतक जिल्ह्यात असलेल्या बाहू अकबरपूर गावातील राहत्या घरी जीवन संपवले. मुस्कान बल्हारा (वय २३) असे तिचे नाव आहे.
रोहतकच्या मेहम भागातील रहिवासी असलेल्या मुस्कान यांचा विवाह डिसेंबर २०२३ मध्ये शीलू यांच्याशी झाला होता. या जोडप्याला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हार्दिक नावाचा मुलगा झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाच्या तपासासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रोहतकचे पोलीस अधीक्षक गौरव राजपुरोहित यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. शीलू बल्हारा याचीही चौकशी केली जात आहे.
मुस्कान यांचा छळ होत असल्याचा आरोप करत त्यांच्या कुटुंबीयांनी घराबाहेर निदर्शने केली. फॉरेन्सिक पथकाने घराची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत. मुस्कान यांचा मृतदेह पीजीआयएमएस-रोहतक येथे नेण्यात आला.
मेहममधील फरमाना गावच्या रहिवासी असलेल्या मुस्कान यांचा विवाह डिसेंबर २०२३ मध्ये शीलू यांच्याशी झाला होता. हे पाऊल उचलण्यापूर्वी गुरूवारी मुस्कानने एका पंजाबी गाण्यावर 'रील' बनवून पोस्ट केली होती.
शीलू याने वयाच्या सहाव्या वर्षी कबड्डी खेळण्यास सुरुवात करण्यापूर्वी ज्युडो आणि कुस्तीचे प्रशिक्षण घेतले होते. पंजाबमध्ये 'हरियाणा आला चीता' म्हणून ओळखले जाणारा शीलू हा एक 'कॅचर' आहे आणि त्याने भारत व परदेशातील संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.