

उरण: देवदर्शनाहून परतणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्ध महिलेला "तुमची मन्नत पूर्ण होईल" असे सांगून भावनिक जाळ्यात ओढत, गळ्यातील ३ तोळ्यांची सोन्याची माळ हातचलाखीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना उरण तालुक्यातील पुंडे गावात घडली आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी (२५ जुलै) दुपार च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व घबराट पसरली आहे. याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार कविता गणेश म्हात्रे (वय ६०, रा. फुंडे) या आषाढी एकादशीनिमित्त भेंडखळ येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर त्या रिक्षाने फुंडे येथील सिडको स्टॉपवर उतरल्या व पायी आपल्या मुलीच्या घराकडे निघाल्या होत्या तेव्हा एका काळ्या रंगाच्या
दुचाकीवरून २५ ते ३० वयोगटातील दोन भामटे आले. त्यांनी कविता म्हात्रे यांच्याजवळ गाडी थांबवून, "आजी, इथे वृद्धाश्रम आहे का?" अशी विचारणा केली. आजींनी "वृद्धाश्रम नाही, मात्र श्रीराम मंदिर आहे" असे सांगितले.
यावर त्या भामट्यांनी तात्काळ आपल्याजवळील पांढऱ्या कॅरीबॅगमध्ये ३ पार्ले बिस्कीटचे पुडे आणि ५०० रुपयांच्या दोन नोटा भरल्या व ती पिशवी आजींच्या हातात दिली. "हे साहित्य मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीसमोर ठेवा, तुमची मन्नत पूर्ण होईल," असे त्यांनी आजींना सांगितले.
तक्रारदार महिलेने त्यांना स्वतः मंदिरात जाऊन ठेवण्यास सांगितले असता, भामट्याने "मंदिरात गर्दी आहे, गळ्यातील सोन्याची माळ कोणीतरी लांबवेल, ती माळ या कॅरीबॅगमध्ये ठेवा" असा सल्ला दिला.
भामट्याच्या भावनिक बोलण्याला बळी पडून कविता म्हात्रे यांनी आपल्या गळ्यातील ३ तोळे वजनाची, सुमारे ३ लाख रुपये किमतीची सोन्याची दोन पदरी माळ काढून त्याच्या हातात दिली. त्या इसमाने माळ पिशवीत ठेवल्याचे भासवून हातचलाखीने ती गायब केली व पिशवीला गाठ मारून आजींच्या हातात सुपूर्द केली.
"पिशवी उघडू नका, नाहीतर मन्नत पूर्ण होणार नाही," असा इशारा देऊन दोन्ही आरोपी काळ्या मोटारसायकलवरून सिडको ऑफिस रस्त्याने पनवेलच्या दिशेने पसार झाले.
आरोपी निघून गेल्यावर संशय आल्याने आजींनी पिशवी उघडून पाहिली असता त्यात सोन्याची माळ आढळली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ घरच्यांना माहिती देऊन न्हावा शेवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र सावजी ढवरे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे.