

UP Crime
मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरमधील नवविवाहित राजा रघुवंशी यांची हत्या त्यांची पत्नी सोनम रघुवंशी हिने केल्याचे प्रकरण गाजत असताना आता उत्तर प्रदेशातही असेच एक प्रकरण समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील एका महिलेला प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तिने पतीची हत्या करुन मृतदेह राप्ती नदीत फेकला होता.
या दोघांच्या लग्नाला १८ वर्षे झाली आहेत. त्यांना १२ वर्षाचा मुलगा आहे. अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव संगीता देवी (३५) असे आहे. तिने मंदिरातून आणलेल्या प्रसादात विष मिसळून तो पतीला खायला दिला. त्यात कन्नन कुमार (४८) याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तिचा प्रियकर अनिल शुक्ला उर्फ विवेक (२७) तिच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान आहे. त्याच्या मदतीने तिने पतीचा मृतदेह २५ फूट उंच पुलावरून बलरामपूरमधील कोडरीजवळ राप्ती नदीत फेकून दिला.
पतीच्या हत्येनंतर, संगीताने वेगळाच बनाव रचला. तिने ५ जून रोजी ढेबरूआ पोलिस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पुढचे तीन दिवस ती प्रियकरासोबत फिरली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत ती ठोस उत्तरे देऊ शकली नाही. यामुळे संशय बळावला. तिच्या मोबाईलचे लोकेशन तपासण्यात आले. यात ती २ जून रोजी पती कन्नन याच्यासोबत होती, असे आढळून आले. हे पुरावे समोर आल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. या हत्येत तिचा प्रियकर अनिलचा सहभाग असल्याचेही उघड झाले.
तिच्या १२ वर्षांच्या मुलाने पोलिसांना सांगितले की, 'पप्पा, मम्मी आणि अनिल काकांसोबत बाहेर गेले होते. पण केवळ मम्मीच घरी परत आली. पप्पा घरी आले नाहीत.' दरम्यान, कन्ननचा भाऊ बाबूलाल याला दोघांमधील बिनसलेल्या नात्याची कल्पना होती. संगीतानेच कन्ननची हत्या केल्याचा संशय भाऊ बाबूलाल याने व्यक्त करत तक्रार दाखल केली.
दरम्यान, १० जून रोजी राप्ती नदीच्या पात्रात कन्ननच्या मृतदेहाचा सांगडा सापडला. त्याच्या कपड्यांवरून त्याची ओळख पटवण्यात आली. बाबू लाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संगीता आणि अनिलला अटक केली.
या प्रकरणाचा तपास शोहरतगडचे पोलिस सर्कल अधिकारी सुजीत राय यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आला. त्यांनी सांगितले की, संगीता आणि अनिल यांची भेट पाच वर्षांपूर्वी झाली होती. ते एका रेल्वे प्रवासादरम्यान एकमेकांना भेटले होते. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. अनिल तिच्या घरी वारंवार येत राहिला. याचा कन्ननला संशय आला. त्याने पत्नीकडे याबाबत विचारले. तिने केवळ दोघांची मैत्री असल्याचे सांगत पतीचा आरोप फेटाळला. त्यानंतर संगीताने अनिलच्या मदतीने हत्येचा कट रचून पतीचा अडसर दूर केला, असे राय यांनी सांगितले.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान संगीताने खुनाची कबुली दिली. 'श्रावस्ती येथील विभूतीनाथ मंदिरात देवदर्शनाला गेलो असताना आम्ही त्याला प्रसादात विष मिसळून तो खाण्यास दिला. त्यानंतर तो बेशुद्ध पडला. आम्ही मंदिरातून परतताना कोदारी पुलावर थांबलो आणि त्याला नदीत फेकून दिले.'
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कन्नन आणि संगीताचा १८ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. तो मासेमारी करून उदरनिर्वाह करत होता. हा खून पूर्वनियोजित होता. तिने तपासदरम्यान पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण चौकशीदरम्यान अखेर तिने खुनाची कबुली दिली," असे पोलिसांनी सांगितले. दोन्ही आरोपींची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.