

Lionel Messi India Visit
कोलकाता : महान फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीच्या बहुचर्चित कोलकाता भेटीला चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रियेचे गोलबोट लागले. केवळ २२ मिनिटांसाठी कार्यक्रमात हजर राहणारा मेस्सी स्टेडियममध्ये १० मिनिटांपेक्षा कमी वेळ उपस्थित होता. यामुळे त्याची एक झलक पाहण्यासाठी तासन्तास वाट पाहणाऱ्या अनेक चाहत्यांची निराशा झाली आणि याच रागातून त्यांनी खुर्च्छा फेकल्या, तसेच अन्य साहित्याची मोडतोड केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने मैदानावर काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला.
या संपूर्ण गोंधळामागे आयोजक आणि त्यांच्या गैरव्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात आले आहे. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासासाठी तातडीने विशेष समितीची स्थापना करण्यात आली. स्टेडियममध्ये पोहोचल्यानंतरही मेस्सीचे दर्शन न झाल्याने लोक बाटल्या फेकू लागले आणि खुर्च्या तोडू लागले. अनेक लोक मैदानात घुसले. मेस्सीभोवती खूप सुरक्षा होती आणि व्हीआयपी लोकांनी त्यांना घेरले होते. यामुळे चाहत्यांना त्याला नीट पाहताच आले नाही.
'GOAT' इंडिया टूरचे आयोजक सताद्रु दत्ता यांना अटक करण्यात आली आहे. सताद्रु दत्ता 'ए सताद्रु दत्ता इनिशिएटिव्ह' नावाने एक फर्म चालवतात, जी जगभरातील फुटबॉलपटूंचे कार्यक्रम आयोजित करते. त्यांनी यापूर्वीही अनेक फुटबॉलपटूंचे यशस्वी कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यांनी लिओनेल मेस्सीच्या संपूर्ण भारत दौऱ्याची जबाबदारी घेतली होती. त्यांनी यापूर्वी पेले, दिएगो मॅराडोना आणि इतर फुटबॉलपटूंचे दौरे देखील आयोजित केले आहेत.
मेस्सी आयकॉनिक सॉल्ट लेक स्टेडियममध्ये दाखल झाल्यानंतर फुटबॉलप्रेमींनी अभूतपूर्व उत्साहात मेस्सीचे स्वागत केले. मेस्सीने खचाखच भरलेल्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये प्रवेश करताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. त्याच्या जयघोषाने स्टेडियम दणाणून गेले. उभे राहून चाहत्यांनी झेंडे फडकावले आणि एकसुरात त्याचे नाव घेत घोषणा दिल्या. मात्र, १० मिनिटांत तो निघून गेल्यानंतर चाहत्यांचा एकच गोंधळ सुरू झाला. या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी कार्यक्रमात झालेल्या गोंधळाबद्दल जाहीर माफी मागितली, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील पोस्टमध्ये ममता बनर्जी म्हणाल्या, सॉल्ट लेक स्टेडियममध्ये आज जी अव्यवस्था पाहायला मिळाली, त्यामुळे मी अत्यंत अस्वस्थ आणि व्यथित झाले आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल मी लियोनेल मेस्सी, तसेच सर्व क्रीडाप्रेमींची मनापासून माफी मागते.