

BJP win local body polls in Thiruvananthapuram
तिरुवनंतपुरम: भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये मोठा विजय मिळवला आहे. तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत एनडीए सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असून, त्यांनी डाव्या लोकशाही आघाडीची (एलडीएफ) या नागरी संस्थेवरील ४५ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर शशि थरुर यांनी स्तुतीसुमने उधळली होती. यावर काँग्रेसमधील नेत्यांनी थरुर यांना धारेवर धरले होते. मात्र आता प्रत्यक्ष त्यांच्याच मतदारसंघातील महानगरपालिका निवडणुकीत भाजपने विजय मिळल्याने हा निकाल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) तिरुवनंतपुरम महापालिका निवडणूक जिंकलीच त्याचबरोबर केरळमधील सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीचा (LDF) त्रिपूनिथुरा नगरपालिका निवडणुकीत पराभव केला. या दोन्ही शहरांमधील पालिका सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने अनेक वर्षांपासून संघर्ष कायम ठेवला होता.
तिरुवनंतपुरम महानगरपालिका निवडणुकीतील विजय हा भाजपसाठी अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या विजयामुळे केरळची राजधानी असणार्या शहरावरील सत्ताधारी एलडीएफचे अनेक दशके असलेले वर्चस्व संपुष्टात आले आहे. शहरी मतदारांच्या मानसिकतेत उल्लेखनीय बदल झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
निकालांवर प्रतिक्रिया देताना, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी या निकालांना केरळच्या लोकशाहीसाठी "आश्चर्यकारक निकालांचा" दिवस असे वर्णन केले. त्यांनी यूडीएफचे एकूण कामगिरीबद्दल अभिनंदन केले. त्याचबरोबर तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाची नोंद घेत प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या बाजूने निकाल लागले तरीही, लोकांच्या आदेशाचा आदर करणे किती महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
एर्नाकुलम जिल्ह्यातील त्रिपूनिथुरा नगरपालिकेत भाजप नेतृत्त्वाखालील एनडीएने काठावरचे बहुमत मिळवले आहे. ५३ सदस्यीय परिषदेत त्यांनी २१ जागा जिंकल्या. एलडीएफ २० जागांसह दुसऱ्या स्थानावर तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी (UDF) १६ जागांसह तिसऱ्या स्थानावर घसरली. भाजपने प्रथमच त्रिपूनिथुरा नगर परिषदेवर सत्ता मिळवली आहे. 'अ' श्रेणीची नगरपालिका म्हणून ओळख असलेल्या त्रिपूनिथुरामध्ये अनेक दशकांपासून एलडीएफ आणि यूडीएफमध्ये आलटून-पालटून सत्ता येत होती. मात्र, नुकत्याच झालेल्या निकालांनी हा नमुना बदलला आहे. तीव्र आणि अटीतटीच्या लढतीनंतर एनडीएने एलडीएफला सत्तेतून दूर केले.२०२० च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, जेव्हा नगरपालिकेमध्ये ४९ प्रभाग होते, तेव्हा सीपीआय(एम) २३ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता, तर भाजपने १७ जागा जिंकल्या होत्या. यावर्षी परिषद ५३ प्रभागांपर्यंत विस्तारली, जी मतदारांच्या निर्णायक बदलासोबत जुळून आली. दरम्यान,एनडीएने पालक्काड नगरपालिकेमधील सत्ता कायम ठेवली आहे.
तिरुवनंतपुरम महानगरपालिका निवडणुकी विजयी झालेल्या भाजपच्या विजयी उमेदवार आर. श्रीलेखा यांनी एएनआयशी बोलतानसा सांगितले की, "माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून, एलडीएफ आणि काँग्रेसकडून माझ्यावर अनपेक्षित मर्यादेपलीकडे जाऊन सतत टीका केली जात होती. माझ्या प्रभागातील जनतेने त्या सर्व टीकेला फेटाळून लावत मला साथ दिली, हे पाहून मला आनंद झाला आहे.
केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ९ डिसेंबर आणि ११ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत पार पडल्या. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, एकूण ७३.६९ टक्के मतदान झाले, ज्यात पहिल्या टप्प्यात ७०.९१ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात ७६.०८ टक्के सहभाग होता. हे निकाल २०२६ मध्ये होणाऱ्या केरळ विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकीय समीकरणे आणि प्रचार धोरणांवर परिणाम करतील, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. भाजपला केरळमधील शहरी भागातून पसंती मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.